Headlines

हिंडलगा कारागृहात अचानक तपासणी


आक्षेपार्ह वस्तू, सुरक्षा यंत्रणेचा आढावा

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावपासून बेंगळूरपर्यंतची कारागृहे सध्या वेगवेगळ्या कारणांनी ठळक चर्चेत आहेत. कारागृहात कैद्यांना पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा, मोबाईल आदींमुळे कारागृह प्रशासनावर टीका होत असतानाच बुधवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात छापा टाकून तपासणी करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्या नेतृत्वाखाली कारागृहावर छापा टाकून वेगवेगळ्या बराकीत तपासणी करण्यात आली आहे. मात्र, या तपासणीत आक्षेपार्ह असे काही आढळले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

2 पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस, डॉग स्क्वॉड व स्फोटक शोधक पथकासह वेगवेगळ्या बराकींची तपासणी करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार कारागृहातील कारभाराबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमधील माहितीवरून पोलिसांनी तपासणी केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याच कारागृहातील एका कैद्याने खंडणीसाठी फोन केला होता. गेल्या सहा महिन्यांत वेगवेगळ्या बराकीत मोबाईल, सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर बुधवारची तपासणी झाली असून वेगवेगळ्या बराकींना भेटी देऊन आक्षेपार्ह वस्तू आहेत का? याची तपासणी करण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत