Headlines

सुनेत्रा वहिनींना निर्णय घेऊ द्या, इतरांनी मध्ये बोलू नये!:शशिकांत शिंदेंचा सुनील तटकरेंना टोला, पक्षांतर्गत बदलांवरही मोठे विधान




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातील आगामी बदल, प्रवक्त्यांची भाषा आणि सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेवर सविस्तर भाष्य केले. सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना दिलेल्या कानपिचक्यांचा संदर्भ देत शिंदे यांनी सुनेत्रा पवार यांच्या गटाला थेट टोला लगावला. “सुनेत्रा वहिनींना स्वतः निर्णय घेऊ द्या, त्यांनी बोलायचे सोडून बाकीचे लोकच पुढे येऊन बोलत असतात,” असे म्हणत त्यांनी तटकरेंना लक्ष्य केले. ‘सुनेत्रा वहिनींना वेळ द्या, त्यांच्यावर लगेच टीका नको’ काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेवर बोलताना शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडली. “एखाद्या गृहिणीवर किंवा भगिनीवर अचानक जेव्हा मोठी राजकीय जबाबदारी येते, तेव्हा ती पेलण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्या सर्वांना सोबत घेऊन निश्चितपणे चांगले काम करतील, अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यावर लगेच चर्चा करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. मात्र, याच वेळी त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांनाही सुनावले. “सुनेत्रा वहिनींनी स्वतः निर्णय घेतले तर चांगले होईल, पण त्या घेतात आणि बाकीचे लोक मीडियासमोर जाऊन बोलतात. त्यांनी निर्णय घेण्याऐवजी इतर लोकच पुढे येतात. आपल्या नेत्याची उंची राखण्याचा प्रयत्न सर्वच नेत्यांनी करणे गरजेचे आहे,” असा खोचक सल्ला त्यांनी सुनील तटकरे आणि इतर नेत्यांना दिला. पक्षात मोठे फेरबदल; ‘जम्बो’ कार्यकारिणी आणि प्रवक्ते रद्द राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षामध्ये लवकरच मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. “आम्ही जम्बो कार्यकारिणी आणि जम्बो प्रवक्तेपद न ठेवता मोजक्या आणि सक्षम लोकांच्या नेमणुका करणार आहोत. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा समन्वय साधून महाराष्ट्राची पूर्ण बॉडी तयार केली जाईल. 15, 16 आणि 24 तारखेला सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेऊन हे सर्व निर्णय अंतिम केले जातील,” अशी माहिती त्यांनी दिली. प्रवक्त्यांनी वापरलेल्या खालच्या स्तरावरील भाषेबाबत (उदा. कराळे गुरुजी) बोलताना शिंदे म्हणाले, “समोरचा शिव्या देतो म्हणून आपणही शिव्या देणे हा सुसंस्कृतपणा नसतो. आम्ही नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर करताना, त्यांना काय बोलायचे आणि काय नाही, याचे रीतसर प्रशिक्षण देणार आहोत.” जितेंद्र आव्हाड यांच्याशी समन्वय नसल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. संजय काकडेंना थेट उत्तर आणि अमोल मिटकरींच्या भेटीवर सस्पेन्स संजय काकडे यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, “संजय काकडेंनी शरद पवारांना उपदेश देऊ नये. पवार साहेबांच्या पाठिंब्यामुळेच त्यांचा व्यावसायिक उदय झाला आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी.” तसेच, अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी शरद पवारांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “पवार साहेबांना भेटायला अनेक जण येतात. मिटकरींचे साहेबांवर प्रेम आहे. ते पक्षात परत आले तर स्वागत करू की नाही, हे आताच सांगता येणार नाही, सध्या मी माझी पक्षबांधणी करत आहे.” जुहू चौपाटीच्या कचऱ्यावरून सरकारला घेरणार जुहू चौपाटीवरील कचऱ्याबाबत चालवलेल्या मोहिमेचे समर्थन करत शशिकांत शिंदे म्हणाले, “आज संध्याकाळी 5 वाजता आम्ही मुंबई महापालिकेत जाऊन या प्रश्नावर आयुक्तांची भेट घेणार आहोत. गिरगाव चौपाटीप्रमाणे जुहू चौपाटीचाही विकास झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे.” “सध्या आम्ही जुहूच्या कचऱ्याचा अभ्यास करतोय आणि सोबतच राजकारणातील कचऱ्याचाही अभ्यास करतोय,” असा मार्मिक टोला त्यांनी शेवटी लगावला. हेही वाचा… अभिजीत दिपके म्हणाले- CJP सध्या राजकीय पक्ष बनणार नाही: दबावगटासारखे काम करू; देशाला नवा पक्ष नव्हे, मजबूत जनआंदोलनाची गरज! नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी जंतर-मंतरवर यशस्वी आंदोलन उभारणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) कोअर कमिटीची दोन दिवसीय बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडत आहे. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशातील सद्य राजकीय आणि न्याय व्यवस्थेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच, देशातील विविध संस्थांची ‘अकाउंटेबिलिटी’ (उत्तरदायित्व) आणि ‘निष्पक्षता’ परत आणण्यासाठी देशव्यापी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या या बैठकीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे सौरव दास, यतीन गोयल , वैष्णवी गौर, रत्ना सिंग, अक्षय मराठे, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रंका हे पदाधिकारी उपस्थित आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत