सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडीतील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात आजपासून विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. हा सप्ताह आषाढी एकादशी, २५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. आज, गुरुवारी सप्ताहाच्या प्रारंभी विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. “विठू नामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला” या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. सप्ताहादरम्यान दररोज विविध भजनी मंडळे आणि संगीत संस्थांचे भजन व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक भजन मंडळ, सावंतवाडी, अभिनव संगीत विद्यालय, भक्तीरंग, साई गणेश भजनी मंडळ (बांदा), सद्गुरू संगीत विद्यालय (सावंतवाडी) तसेच नवार वारकरी भजन मंडळ, वेंगुर्ले-भेंडामळा आदींचा सहभाग असणार आहे. सप्ताहाच्या निमित्ताने दररोज भक्तिमय संगीत रजनी सादर करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिर समितीच्या सदस्यांनी दिली.
