सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षांनी आज सावंतवाडी एसटी बसस्थानकाला अचानक भेट देत प्रवाशांच्या समस्या आणि बससेवेतील अनागोंदीची थेट पाहणी केली. या पाहणीदरम्यान शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय, बसफेऱ्या रद्द होणे, गाड्या नियोजित वेळेत न सुटणे तसेच महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला. या प्रकारांची गंभीर दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे तसेच बससेवा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.
शाळकरी विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेतल्याची तक्रार
सायंकाळी 7 वाजेपर्यंत बसस्थानकात थांबलेल्या शाळकरी मुलांशी नगराध्यक्षांनी संवाद साधला. बसमध्ये जागा नसल्याचे कारण देत कंडक्टरने लोकल बसमध्ये विद्यार्थ्यांना घेण्यास नकार दिल्याचे यावेळी समोर आले. त्यानंतरची 7 वाजताची बसफेरीही रद्द करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आगारप्रमुखांना देण्यात आले आहेत.
रात्रीच्या वेळी महिला सुरक्षेचा प्रश्न
काही दिवसांपूर्वी एका मुलीने रात्रीच्या वेळी बसस्थानकात प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटत नसल्याची तक्रार नगराध्यक्षांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत नगराध्यक्षांनी रात्रीच्या वेळी बसस्थानकाची अचानक पाहणी केली.
या पाहणीदरम्यान वेंगुर्ला डेपो परिसरात काही जण मद्यपान करून बसत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. तसेच सावंतवाडी डेपोतून सुटणाऱ्या काही बस नियोजित वेळेत सुटत नसल्याचे आणि काही फेऱ्या विनाकारण रद्द होत असल्याचेही समोर आले.
या सर्व बाबींवर आगारप्रमुखांशी चर्चा करून बसचे वेळापत्रक योग्य पद्धतीने नियोजित करण्याचे आणि गाड्या वेळेत सोडण्याचे निर्देश देण्यात आले.
महिला पोलिसांची मागणी
महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नगराध्यक्षांनी यापूर्वीच सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक श्री. मगदूम यांच्याशी पत्रव्यवहार करून 2 महिला पोलीस कॉन्स्टेबल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
तसेच आगारप्रमुख कुबडे यांच्याशी चर्चा करून सायंकाळी 6.30 नंतर वेंगुर्ला बसस्थानकावर लागणाऱ्या सर्व गाड्या वरच्या डेपोतूनच सुटतील, असे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना सुरक्षित प्रवास करता यावा, हा या नियोजनामागील उद्देश आहे.
यासंदर्भात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या नियुक्तीसाठी आगारप्रमुखांकडूनही सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.
‘पिंक रिक्षा’साठी निधीचा पाठपुरावा
ग्रामीण भागातून शिक्षण, नोकरी आणि इतर कामांसाठी सावंतवाडीत येणाऱ्या महिला व विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ‘पिंक रिक्षा’ किंवा विशेष महिला टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.
यासाठी नगराध्यक्ष पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासाला मोठी मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
