Headlines

सावंगी शिवारात 2 घोरपडींची शिकार:वनविभागाची धडक कारवाई, चार आरोपींना अटक




नागपूर वनविभागांतर्गत पवनी वनपरिक्षेत्रातील सावंगी येथे वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. सावंगी बीटमधील राखीव वन कक्ष क्रमांक ४२३ मध्ये दोन घोरपडींची शिकार करून त्यांचे मांस कापताना आणि भाजताना चार आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वनकर्मचारी नियमित गस्तीवर असताना त्यांना सावंगी बीटमधील राखीव वनक्षेत्रात संशयास्पद हालचाली दिसल्या. तात्काळ धाड टाकून शिकार करणाऱ्या टोळीला घेरण्यात आले. घटनास्थळावरून सागर शेषराव धुर्वे (वय २३), रविंद्र बुध्या मरसकोल्हे (वय ४२), प्रशांत विवेक मरसकोल्हे (वय २६) आणि दिनेश जगत आहाके (वय १८ वर्षे ९ महिने, सर्व रा. सावंगी) या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपींनी राखीव वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून वन्यजीवांची शिकार केली तसेच वनक्षेत्रात आग लावल्याचे निष्पन्न झाले आहे. वनविभागाने कारवाईदरम्यान घटनास्थळावरून दोन घोरपडींचे मांस, दोन सत्तूर, दोन ब्लेड, भिर्रा प्रजातीचा एक लाकडी ओंडका आणि दोन मोबाईल जप्त केले. जप्त केलेले वन्यजीवांचे अवशेष सीलबंद करून पुढील तपासासाठी फॉरेन्सिक चाचणीला पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करून रामटेक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नागपूर वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक गोविंद लुचे आणि मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली. या कारवाईत पवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड, क्षेत्र सहाय्यक वाय. बी. पाटील, बीटरक्षक एम. पी. पंचबुधे, वनरक्षक जी. ओ. राऊत, व्ही. एस. सोडगीर, एस. आर. मरसकोल्हे, इमरत टेकाम, विनोद टेकाम आणि इतर वनकर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत