मनाचं मोठेपणा जपणारा प्रांत धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकच्या काही प्रांतात खान्देशाशी सांस्कृतिक संबंध असलेल्या परिसरात या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. हा केवळ देवीची पूजा करण्याचा सोहळा नसून कुटुंब, भाऊकी, नातेसंबंध, लोककला आणि अहिराणी संस्कृती यांना एकत्र संगम असणारा उत्सव आहे. कानबाई/कानुबाई मातेचा उत्सव हा खान्देशाच्या लोकसंस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा श्रावणी लोकोत्सव आहे.
श्रावण महिन्यात, नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी तर काही ठिकाणी दुसऱ्या रविवारी कानबाईची स्थापना केली जाते, असं जितेंद्र देसले यांनी सांगितलं.
कानबाई माता उत्सव काय आहे?
कानबाई माता खान्देश आणि तापी नदीच्या खोऱ्यात पूजली जाणारी लोकदेवता आहे. तिचे स्वरूप नेमके कोणत्या देवीशी संबंधित आहे याबाबत वेगवेगळ्या लोकमान्यता आहेत. काही परंपरांमध्ये तिला पार्वतीचे रूप (शंकर म्हणजे कन्हेर राजा) तर काही ठिकाणी सूर्यपत्नी मानले जाते. तर काही ठिकाणी राधा-रुक्मिणी असेही मानले जाते.
1264 सालचे यादव काळातील कानबाईचे मंदिर
या सणाची साक्ष म्हणून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बलसाणे येथे खान्देश ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेचे प्राचीन मंदिर, जे यादव काळात १२६४ साली बांधले गेलेले आहे. खान्देशात अनेक गावात कानबाई मातेचे मंदिरं आहेत. कानबाई मातेचा उत्सव, पूजा खान्देशात साडेचार हजार वर्षांपूर्वी म्हणजेच दीर्घकाळापासून चालत आलेली लोकपरंपरा आहे आणि ती शेती, पाऊस, समृद्धी, कुटुंबाचे ऐक्य आणि मातृशक्तीशी जोडलेली आहे.
Jenabai Daruwali : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जिला आई मानायचा, जेनाबाई दारुवाली कोण होती?
पंरपरा नेमकी काय?
कानबाई-रानबाई अशी संयुक्त पूजा करण्याचीही परंपरा आहे. शनिवारी रात्री कानबाईच्या रोटोत्सवातील कानबाईच्या अंगणी भाऊकी जमते, आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीची आठवण आणि त्यास दिलेला प्रतिसाद म्हणून चुलीवर कडण्याची (कळण्याची भाकर ही थोडं जाडं मीठ, ज्वारी आणि उडदाच्या मिश्र पिठापासून) भाकर थापली जाते,किल्लूची भाजी सुगंध दरवळते आणि खान्देशची माती पुन्हा एकदा मनात घर करून जाते.
कानबाईची स्थापना कशी केली जाते?
कानबाईची स्थापना व सजावट ज्याच्या त्याच्या पद्धतीने मनोभावे रविवारी सकाळी केळीचे व कण्हेरीचे खांब बांधून मंडप सजवला जातो. कलशावर नारळ ठेवून त्याला नथ व डोळ्यांची पारंपरिक सजावट करून कानबाई मातेची स्थापना केली जाते. कानबाईला साडी, खण, नथ, दागिने, फुले, गजरा इत्यादींनी पारंपरिक पद्धत. चौरंगावर कानबाईचे प्रतीक म्हणून नारळ/मुखवटा स्थापित करणे. देवीला साडी, नथ, दागिने, वेणी इत्यादींनी सजवणे होते.
रानबाईचीदेखील मांडणी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
रानबाईची परंपरा असल्यास तिचीही मांडणी करतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी महिलांची पारंपरिक अहिराणी गाणी, ओव्या, फुगडी आणि इतर लोकपरंपरा साजऱ्या केल्या जातात. हीच कानबाई उत्सवाची सांस्कृतिक ओळख आहे. अर्थातच यात विधीवत अथवा शास्त्रोक्त काहीच नाही. जोड तडजोड करून श्रद्धेने पूजा मांडून शाश्वतनिष्ठा आणि आपुलकी जी भावकी आणि गावकीला एकत्र ठेवू शकेल. ज्यातून मनामनातून आपलेपणा वाढेल.
उत्सावाचे वेगळेपण काय?
कानबाई मातेचा उत्सव हा “काय केले तर देवी रागावेल?” या भीतीपेक्षा कुटुंबाचे ऐक्य, अन्नाचा सन्मान, निसर्गाबद्दल कृतज्ञता, आपुलकी आणि खान्देशी संस्कृतीचे जतन यांचा उत्सव म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. रोटाला अन्नाचे/पूर्णब्रह्माचे प्रतीक मानण्याची लोकमान्यता याच भावनेशी जोडलेली आहे.
जात, पात, धर्म बाजूला ठेवून अत्यंत पवित्र असा भावकीचा, पर्यावरणाचा आणि सामाजिक जाणिवेचा सन्मान करणारा हा कानबाई उत्सव यासाठी हळद-कुंकू, अक्षता, फुले, धूप-दीप अर्पण करून देवीची पूजा करतात. घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा परंपरा माहिती असलेली व्यक्ती पूजा करतात. ज्येष्ठांच्या मर्जीने भावकीतील मानाच्या व्यक्तीला सपत्नीक आरतीचा मान देण्यात येतो.
रोट उत्सव म्हणूनही ख्याती
कानबाई उत्सवाला अनेक ठिकाणी “रोट उत्सव” असेही म्हणतात. गहू हा या उत्सवातील महत्त्वाचा घटक आहे. रोटांच्या निमित्ताने घरातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे शेर दोन शेर गव्हाची निवड होते. त्यात पाळीव जनावरांचा हिस्सा, कानबाई, रानबाई, कन्हेर यांच्या नावाने पाच-पाच मूठ गहू वाढविला जातो. प्राणी, वनस्पतीही घरातील सदस्यच आहेत, हा यातला भाव.
कानबाईला नवैद्य म्हणून रोट
या पिठातून साधे रोट, मोठे रोट बनवले जातात. आणि त्यापासून पारंपरिक रोट तयार केले जातात. काही परंपरांमध्ये पशुधन, कानबाई, रानबाई इत्यादींच्या नावानेही अतिरिक्त गहू घेण्याची पद्धत आहे. कानबाईचा मुख्य नैवेद्य म्हणजे रोट. गव्हाच्या पुरणपोळ्या, गूळ-तूप घालून बनवलेल्या. रोट फक्त घरातील मंडळी खातात. बाहेरच्या व्यक्तींना भावकीच्या रोटाचा प्रसाद देण्याची परंपरा नाही.
रोटचा नेमका नियम काय?
दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही रोटांचचं जेवण असतं. रोट (म्हणजे सवा-सवा मूठ गहु घेऊन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं. रोट संपेपर्यंत जेऊन हात धुतलेलं पाणी नि उष्ठ्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. पौर्णिमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठ खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास असतो. भावकीत एकी होवो, सर्वांचे मंगल होवो हाच आदर्श या उत्सवाचा.
कानबाईची विसर्जन मिरवणूक कशी असते?
दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून कानबाईचे विसर्जन नदी, विहीर किंवा तलावात केले जाते. कानबाई मातेच्या उत्सवातील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे विसर्जन मिरवणूक. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घराघरांत उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मातेची पूजा-अर्चा करून सजविलेली मूर्ती अथवा चौरंग डोक्यावर घेऊन भक्त मिरवणुकीत सहभागी होतात.
चौरंगावर सुंदर पद्धतीने सजवलेली कानबाई मातेची मूर्ती प्रत्येक जण आदराने तोच चौरंग एकमेकापासून आपल्या डोक्यावर घेत मस्त मजेत चालत असतात. ह्या मिरवणुकी दरम्यान भक्ती भावात रंग झालेल्या भावकीवर पाण्याचा वर्षाव करण्यात येतो. अतिशय हर्ष उल्हासात ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, अहिराणी गीते आणि फुगडीच्या माध्यमातून आनंद घेत संपूर्ण गावभर मिरवणूक काढून मोबाईलच्या जमान्यात असंख्य फोटो सेल्फी काढत हा आनंदोत्सव आपल्या स्मरणात टिपत असतात.
पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा
कानबाईची परंपरा टिकवायची असेल तर केवळ पूजा आणि मिरवणूक पुरेशी नाही. अहिराणी भाषा, कानबाईच्या ओव्या, पारंपरिक रोट, फुलोरा, लोककला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाऊकीची भावना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. पिढ्यान्पिढ्या कुटुंबातील मोठी मंडळी लहानांना ही परंपरा सांगत आल्याचेही उल्लेख आहेत.
Sangita Chandgude : खवड्या डोंगरावरुन जीव गमावणाऱ्या संगीता चांदगुडे यांचा व्हिडीओ व्हायरल, प्रेम आणि नात्याबद्दल भावनिक भाष्यकानबाई म्हणजे श्रद्धा, रोट म्हणजे अन्नसंस्कृती, अहिराणी गीते म्हणजे लोकवारसा आणि भाऊकी म्हणजे या सगळ्यांना जोडणारा प्रेमाचा धागा. कानबाई माता उत्सवाचा खरा गोडवा “देवीच्या दर्शनापेक्षा माणसांच्या मनामनांचे दर्शन घडण्यात” आहे.
उत्सव साजरी करताना ‘या’ गोष्टींची आवश्यकता
अनेक वर्ष सामाजिक पावित्र्य आणि निर्बल भाव टिकवणारा हा कानबाई मातेचा उत्सव आहे मात्र परंपरा टिकवताना तिचे मूळ स्वरूप, साधेपणा आणि सामाजिक संदेश जपणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च, दिखावा, ध्वनिप्रदूषण किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रथा वाढवण्याऐवजी उत्सव अधिक सुसंस्कृत, पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक करणे गरजेचे आहे.
आजच्या पिढीने कानबाईला केवळ एक धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता आपल्या पूर्वजांनी दिलेला सांस्कृतिक वारसा म्हणून समजून घेतले पाहिजे. श्रेष्ठांनी आणि ज्येष्ठांनी परंपरेची माहिती तरुणांना सांगावी आणि तरुणांनी ती आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने पुढे न्यावी.
कानबाई टिकली तर परंपरा टिकेल, परंपरा टिकली तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर खानदेशची ओळख टिकेल, आणि भाऊकी टिकली तर माणुसकी टिकेल. म्हणूनच कानबाई माता उत्सव टिकवणे ही केवळ धार्मिक जबाबदारी नसून खान्देशच्या या अद्वितीय सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याची सामूहिक जबाबदारी आहे, असं कॅप्टन डॉ. जितेंद्र देसले यांनी सांगितलं.

