वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या बॉक्सर साक्षी चौधरीने शुक्रवारी एक महत्त्वाचा खुलासा केला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिच्या कारकिर्दीला प्रायोजक म्हणून आर्थिक पाठबळ देत असल्याचे साक्षीने सांगितले.
साक्षीने बोलताना सांगितले की, सुवर्णपदक जिंकावे ही तिच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती. ‘मी माझ्या कुटुंबाला 100 टक्के प्रयत्न करण्याचे आणि या पदकासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे वचन दिले होते. हे वचन पूर्ण केल्याचा मला आनंद आहे,’ असे तिने सांगितले.
विराट कोहलीचा मोलाचा पाठिंबा
साक्षीने आपल्या यशामध्ये विराट कोहलीच्या योगदानाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. ‘विराट कोहलीने माझ्या संपूर्ण प्रवासात मला खूप साथ दिली. तो माझा प्रायोजक राहिला आहे. त्याचे मी मनापासून आभार मानते,’ असे साक्षीने सांगितले.
तिरंगा आणि राष्ट्रगीताचा अभिमानाचा क्षण
पदक वितरण समारंभातील क्षण साक्षीसाठी अत्यंत भावनिक होता. भारताचे राष्ट्रगीत वाजत असताना तिरंगा फडकताना पाहणे हे आपले स्वप्न पूर्ण झाले असल्याचे तिने सांगितले. ‘परदेशात माझ्या कामगिरीमुळे भारताचे राष्ट्रगीत ऐकणे आणि तिरंगा फडकताना पाहणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानाचा क्षण होता. आपण देशासाठी खूप मेहनत करतो आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,’ असे साक्षी म्हणाली.
अंतिम सामन्यात इंग्लंडच्या बॉक्सरवर मात
महिलांच्या 51 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात साक्षी चौधरीने इंग्लंडच्या ऊबी व्हाइटचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या विजयामुळे कॉमनवेल्थ गेम्समधील भारताच्या बॉक्मिस्ंाग पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली.
