Headlines

सहा दिवसांच्या खंडानंतर अहिल्यानगरमध्ये अर्धा तास कोसळला दमदार पाऊस:नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतमध्ये सरासरी ओलांडली; राहुरी फक्त 34.7 टक्क्यांवर


.

जिल्ह्यात बुधवारी अनेक तालुक्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावत खरीप पिकांना दिलासा दिला. मात्र, पावसाचे चित्र अजूनही जिल्हाभर एकसारखे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. शहरात मागील सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. सावेडी, कल्याण रोड, दिल्ली गेट, स्वास्तिक चौक परिसरात जोरदार सरी कोसळल्या. उड्डाणपुलाखाली काही काळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. केडगाव व भिंगार परिसरात सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

कर्जत (१५१.४ टक्के), श्रीगोंदे (१४५.४ टक्के) आणि पारनेर (१३५.६ टक्के) तालुक्यांनी सरासरी ओलांडली.

स्थिती कायम राहिल्यास पिकांना फायदा जूनपासूनची आकडेवारी पाहता कर्जत, श्रीगोंदे, पारनेर आणि नगर तालुके सरासरीच्या पुढे आहेत; तर राहुरी, श्रीरामपूर, राहाता आणि कोपरगावमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सहा दिवस अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, ही स्थिती कायम राहिल्यास पिकांच्या वाढीस मदत होण्याबरोबरच शेतकऱ्यांना आंतरमशागत व खत व्यवस्थापनाचीही संधी मिळणार आहे.

पिकांना खूप कमी फायदा ^ बुधवारी काही ठिकाणी झालेला पाऊस हा कमी पाण्यातील पिकांसाठी उपयुक्त असला तरी हा पाऊस अत्यंत तुरळक ठिकाणी आणि पावसाच्या अत्यंत कमी सरी बरसल्या. यातून पिकांना खूप कमी फायदा होईल. मात्र यानंतर १७ ते २१ जुलै दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने त्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना चांगला फायदा होणार आहे. – डॉ.रवी आंधळे, हवामान अभ्यासक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.

तालुकानिहाय पावसात तफावत का? एकाच जिल्ह्यात सर्वत्र सारखा पाऊस पडत नाही. यामागे स्थानिक भौगोलिक रचना, डोंगररांगा, वाऱ्याची दिशा, ढगांची हालचाल आणि स्थानिक तापमानातील फरक ही प्रमुख कारणे असतात. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या भागात ढग अडून अधिक पाऊस पडतो, तर पर्जन्यछायेतील भागात तुलनेने कमी पाऊस होतो. याशिवाय स्थानिक मेघगर्जना झाल्यास काही किलोमीटर परिसरात मुसळधार पाऊस पडतो, तर शेजारच्या भागात पाऊसही पडत नाही. त्यामुळे तालुकानिहाय पावसात मोठी तफावत दिसून येते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत