Headlines

सरपंच मंगेश साबळे यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, व्हिडीओ जारी करत भूमिका मांडली


सरपंच मंगेश साबळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला आहे. मंगेश साबळे यांनी व्हिडीओ जारी करत आपली भूमिका मांडली आहे.

Mangesh Sable
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, ​छत्रपती संभाजीनगर : तडीपारीची नोटीस बजावल्यानंतर गेवराई पायगाचे सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पुन्हा एकदा अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. “आयएएस आणि आयपीएस दर्जाचे अधिकारी एका सरपंचाला संपवण्यासाठी खोटे साक्षीदार उभे करून गुन्हे दाखल करत आहेत. माझी मान छाटली तरी मी मागे हटणार नाही”, असा इशारा त्यांनी दिला आहे.

​घटनेची पार्श्वभूमी काय?

गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 8 गंभीर गुन्हे नोंद असल्याचे सांगत, पोलीस प्रशासनाने त्यांना छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालन्यातून 2 वर्षांसाठी तडीपार का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसनंतर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करत साबळे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दुसरीकडे, या कारवाईच्या निषेधार्थ गेवराई पायगा येथील शेकडो गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. तडीपारीच्या या संपूर्ण कारवाईवर मंगेश साबळे यांनी स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये त्यांनी पोलीस प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधत आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

​व्हिडिओमध्ये मंगेश साबळे नक्की काय म्हणाले?

“मी न्यायालयाच्या अटींनुसार नियमित पोलीस ठाण्यात हजेरी लावतो, याला कायदा पाळणे म्हणतात. परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारीच राजकीय नेत्यांचे बाहुले बनून कायदा हातात घेत आहेत. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोराने सामान्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि हक्कासाठी आवाज उठवला की तो यांच्या डोळ्यात खुपतो, कारण आमच्यामुळे यांचा भ्रष्टाचार उघड होत आहे.”

​”मी कलेक्टर साहेबांना खाली येऊन भेटायला सांगितले आणि सीईओ मॅडमची गाडी अडवली, कारण माझ्या वेदना आणि संताप खरा होता. सीईओ मॅडमना माहिती होते की मी मांडलेले प्रश्न रास्त आहेत, म्हणूनच त्यांनी एका रात्रीत १२० कागदपत्रे तयार करून प्रश्न सोडवले. त्यानंतर पोलिसांनी सीईओ मॅडमवर माझ्याविरोधात तक्रार देण्यासाठी दबाव आणला, मात्र त्यांनी नकार दिला. शेवटी हवालदारावर दबाव आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.”

​”माझ्यावर खंडणीचा आरोप करणाऱ्या एका तरी व्यक्तीला माझ्यासमोर आणून दाखवा. डीसीपी पंकज आतुलकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कितीही सूडबुद्धीने कारवाई केली तरी मी सरेंडर होणार नाही. एका मंगेश साबळेला संपवण्याचा प्रयत्न कराल, तर महाराष्ट्रात १४ हजार मंगेश साबळे उभे राहतील.”