Headlines

समृद्धी महामार्गावर 31 तासांत 2 दरोडे; 20 लाखांचा ऐवज पळवला:हिंदी भाषिक दरोडेखोरांची छत्रपती संभाजीनगरच्या वकिलाला मारहाण




समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी ३१ तासात दोन ठिकाणी लूटमार करत दागिने, रोख रकमेसह २० लाख रुपये प‌‌‌ळवले. त्यातील पहिली घटना २६ ऑगस्टला लासूर टोलनाक्याजवळ घडली. त्यात अहिल्यानगरच्या फॉर्च्युनरचालकाची दीड लाखांची सोन्याची चेन लुटण्यात आली. दुसऱ्या घटनेत लोखंडी धारदार वस्तू फेकून वाहनांचे टायर फोडत दरोडेखोरांनी शुक्रवारी मध्यरात्री तीन कारमधील प्रवाशांना लुटले. सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगवाडी शिवारात (चॅनेल क्र. ५३८ ते ५४३ दरम्यान) गुरुवारी रात्री ११.४५ ते शुक्रवारी मध्यरात्री १.४० वाजेच्या दरम्यान एकापाठोपाठ तीन वाहने टायर फुटल्याने थांबली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील वकिलाच्या कुटुंबाला मारहाण करून १८ लाख रुपयांचा ऐवज लुटला, अन्य एका कारला लक्ष्य केले. तर तिसऱ्या घटनेत नांदेडच्या व्यावसायिकाने स्वरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. संभाजीनगरच्या गारखेडा भागातील ॲड. श्रीकांत मिश्रा (३७) कुटुंबीयांसह कारने (एमएच २० जीके ०२०२) मुंबईकडे जात असताना, रात्री पावणेबाराच्या सुमारास लोखंडी वस्तूमुळे त्यांच्या वाहनाचे टायर फुटले मिश्रा यांनी १२० चा वेग नियंत्रित करत गाडी थांबवली. तितक्यात दबा धरून बसलेल्या १० ते १२ हिंदी भाषिक दरोडेखोरांनी मिश्रांना लाकडी दांडक्याने मारहाण करत लहान मुलांना गाडीबाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सोन्याचे दागिने, महागडी घड्याळे व रोख ८४,५०० असा एकूण १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज दरोडेखोरांच्या हवाली केला. त्यानंतर या टोळक्याने हिंगोली ते मुंबई प्रवास करणाऱ्या एमएच ३८ एडी ८५४९ या इर्टिगा कारलाही अडवले. मात्र त्याबाबत तक्रार पाेलिसांकडे दाखल नाही. मध्यरात्री १.४० च्या सुमारास याच पट्ट्यात मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या नांदेड येथील मोहम्मद फरान यांच्या इंडीव्हर कारचेही (एमएच १२ टीके ५८२३) टायर फोडले. कार थांबताच शस्त्रधारी दरोडेखोर चालकाला मारहाण करत फरान यांच्या दिशेने धावले. परिस्थितीची पाहून फरान यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन राऊंड फायर केले. दरोडेखोर पळाले. फर्स्ट पर्सन: मी तात्काळ हवेत गोळीबार केल्याने दरोडेखोर पळून गेले मोहम्मद फरान, व्यावसायिक, नांदेड टायर फुटल्यानंतर चालकाने गाडी नियंत्रित करून १०० मीटर पुढे नेऊन उभी केली. खाली उतरून बघत असतानाच शेजारच्या शेतातील खांबावरील दिव्याच्या उजेड्यात पाच ते सहा जण समृद्धी महामार्गाचे कठडे चढून धावत येत असल्याचे दिसले. तर समोरच्या बाजूने चौघेजण आले. दोघांनी चालकाला धरले व दोघे माझ्याकडे येत होते. गाडीमध्ये पत्नी, ६ वर्षांचा मुलगा व सहा महिन्यांची मुलगी होती. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ परवानाधारक पिस्तुलामधून गोळीबार करावा लागला. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. गोळीबारानंतर मीच प्रचंड तणावात होतो. पाठीमागून आलेल्या पोलिसांनी याअगोदर दोन वाहनांना लुटल्याचे सांगितले. दरोडेखोर महामार्गावर सहजगत्या चढून आले आणि पळूनही गेले, हे पाहता समृद्धीवर सुरक्षिततेकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे. वैजापूर । मदत हवी असे म्हणत गाडी रोखली लासूर टोलनाक्याजवळ ८ जणांनी १० मिनिटात फॉर्च्युनरचालकाला लुटले २६ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास साहिल सोनवणे (रा.चाकळीमिया, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर) नागपूरहून नाशिककडे फॉर्च्युनरने (क्र.एमएच-०२ ईयू-२४८१) जात होते. तेव्हा त्यांच्या पाठलागावरील ३ कारमधील ८ जणांनी त्यांना ‘मदतीची गरज आहे’ असे म्हणत लासूर टोलनाक्याजवळ त्यांना रोखून मारहाण करत त्यांची २५ ग्रॅमची दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी प‌ळवली. या प्रकरणी २७ ऑगस्टला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. सिनेमातील दृश्यासारखे घेरले होते लूटमार करणाऱ्यांनी लासूर स्टेशनच्या आधीपासूनच फॉर्च्युनरचालक साहिल सोनवणे यांचा पाठलाग सुरू केला होता, असे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यांनी ३ वाहने एखाद्या सिनेमातील दृश्याला शोभेल अशा पद्धतीने सोनवणेंच्या वाहनांभोवती आणली की त्यांना गाडी थांबवण्याशिवाय अन्य पर्यायच ठेवला नाही. ‘मदत हवी’ असा बहाणा करत डाव साधला… गाडी थांबताच काही संशयित मदतीची गरज असल्याचे भासवत चालकाजवळ पोहोचले. सोनवणेंना बाहेर बोलावण्यात आले आणि त्यानंतर मारहाण करत गळ्यातील सोनसाखळी काढून टोळके वाहनांसह पसार झाले. टोळके ८ जणांचे होते, असे सोनवणेंनी सांगितले. डीवायएसपी विनय सोनवणे तपास करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत