Headlines

सकाळचं दृश्य पाहून पंकज हादरला, अजस्त्र अजगराने पाच जीव गायब केले, रात्रीच्या थराराने गावकरी भयभीत


Sindhudurg News : रात्री कुत्री आणि तिची चार पिल्ले अचानक गायब झाली. सकाळी मांगरात फुगलेल्या पोटाचा १५ फुटी अजगर दिसला आणि सगळं रहस्य उलगडलं. सिंधुदुर्गातील या धक्कादायक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं काय घडलं?

python swallows dog and 4 puppies in sindhudurg
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात घडलेल्या एका घटनेने ग्रामस्थांची झोप उडाली आहे. रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात आलेल्या तब्बल १५ फुटी अजगराने एका जनावरांच्या मांगरात (गोठ्यात) शिरून पाळीव कुत्रा आणि त्याच्या चार पिल्लांना जिवंत गिळंकृत केलं. सकाळी समोर आलेलं दृश्य पाहून मालकासह गावकरीही हादरले.

सकाळी मांगरात गेल्यावर धक्का बसला

मोर्ले येथील रहिवासी पंकज गवस यांच्या जनावरांच्या मांगरात एक पाळीव कुत्री आणि तिची चार लहान पिल्ले राहत होती. नेहमीप्रमाणे सकाळी गवस मांगरात गेले. मात्र, कुत्री आणि तिची पिल्ले कुठेच दिसत नव्हती. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता, एका कोपऱ्यात प्रचंड आकाराचा अजगर निपचित पडलेला दिसला. अजगराचं पोट प्रचंड फुगलेलं होतं. ते पाहताच त्याने मोठं भक्ष गिळल्याचा संशय आला. काही वेळातच कुत्री आणि तिच्या चार पिल्लांचं नेमकं काय झालं, याचा उलगडा झाला.

रात्रीच केला होता सगळा गेम

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी भक्षाच्या शोधात हा १५ फुटी अजगर मांगरात शिरला. त्याने पाळीव कुत्र्यासह तिच्या चारही पिल्लांना एकामागोमाग गिळंकृत केलं. सर्व भक्ष फस्त केल्यानंतर अजगर त्याच ठिकाणी सुस्तावून पडून राहिला. त्यामुळे सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेनंतर गावभर एकच खळबळ

मांगरात एवढा मोठा अजगर असल्याची बातमी काही क्षणांतच मोर्ले गावात पसरली. अजगराला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वनविभागाला माहिती देण्यात आली.

वनविभागाची शिताफी

माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी अत्यंत शिताफीने १५ फुटी अजगराला पकडलं. त्यानंतर मानवी वस्तीपासून दूर असलेल्या सुरक्षित नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आलं.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, रात्रीच्या वेळी जनावरांच्या गोठ्यांची आणि घराजवळील परिसराची अधिक काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा