Headlines

शुभमन गिलबरोबर मैदान गाजवणाऱ्या फलंदाजाविरुद्ध तीन खेळाडूंची तक्रार, श्रीलंकन पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय?


Manjot Kalra News : भारताचा माजी अंडर-19 क्रिकेटपटू आणि जाफना किंग्सचा सहमालक मनजोत कालराला लंका प्रीमियर लीगदरम्यान खेळाडूला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीलंकेत अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे सर्व प्रकरण?

Manjot Kalra Arrest
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : 2018 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देणारा माजी क्रिकेटपटू मनजोत कालरा मोठ्या वादात सापडला आहे. लंका प्रीमियर लीग (एलपीएल) 2026 सुरू होण्याच्या काही तास आधी श्रीलंकेच्या क्रीडा भ्रष्टाचारविरोधी तपास पथकाने त्याला अटक केली. एका खेळाडूला पैशांचे आमिष दाखवून सामन्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

खेळाडूला लाच देण्याचा आरोप

27 वर्षीय मनजोत कालराने क्रिकेटनंतर क्रीडा व्यवसायात प्रवेश करत यावर्षी जाफना किंग्स फ्रँचायझीमध्ये सहमालक म्हणून गुंतवणूक केली होती. श्रीलंकन पोलिसांच्या माहितीनुसार, एलपीएल स्पर्धेदरम्यान एका खेळाडूला आर्थिक आमिष दाखवत त्याच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित खेळाडूने दहा दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला आणि आज कालराला अटक करण्यात आली.

Maharashtra TimesRohit Sharma Retirement : रिटायरमेंटच्या चर्चांमुळे रोहित इंग्लंडविरुद्ध दबावात खेळतोय? टीम इंडियाचे बॅटिंग कोच नेमकं काय म्हणाले?

तीन खेळाडूंच्या तक्रारीनंतर कारवा

या प्रकरणात भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि दुनिथ वेलालागे या श्रीलंकेच्या खेळाडूंनी अधिकृत तक्रार नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे तिघेही जाफना किंग्सकडून खेळतात. एलपीएल 2026 च्या पहिल्याच दिवशी जाफना किंग्सचा सामना गॉल गॅलंट्स संघाविरुद्ध होत असताना ही कारवाई करण्यात आली. पाच संघांच्या या स्पर्धेत एकूण 24 सामने खेळवले जाणार असून अंतिम सामना 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

एलपीएल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

लंका प्रीमियर लीगमध्ये यापूर्वीही सामना निश्चिती, लाच आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या एका एलपीएल फ्रँचायझीच्या मालकाला खेळाडूला सट्टेबाजीसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने एलपीएलचे सामने नियोजित वेळापत्रकानुसारच सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे.

Maharashtra TimesIND vs ENG : 180 वर फक्त 3 विकेट, मग भारताचा डाव असा कसा कोसळला? इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकलाही पडला प्रश्न, काय म्हणाला?

मनजोत कालरावरील आरोप सिद्ध होतात की नाही, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र एलपीएल सुरू होताच घडलेल्या या घटनेमुळे स्पर्धेच्या प्रतिमेला पुन्हा धक्का बसला असून क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.