सावंतवाडी वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्ह्याची पारंपरिक आणि समृद्ध लोककला असलेल्या दशावतार कलेचे जतन, संवर्धन तसेच लोककलावंतांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘हयग्रीवासूर संहार’ रविवार, दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी परुळे बाजारपेठ येथील वराठी मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील दुर्बल व गरजू घटकांना उभारी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लोककल्प फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला मदतीचा हात देण्याच्या उद्देशानेही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाला परिसरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी श्री. सचिन देसाई मित्र मंडळ, परुळे, हॉटेल आर्यवत, भोगवे, हॉटेल लीलाज, भोगवे आणि लालचिरा होम स्टे, कोरजाई यांचे सहप्रायोजकत्व लाभले. या सहप्रायोजकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनाला अधिक बळ मिळाले. लोककला संवर्धनाच्या या उपक्रमासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल लोकमान्य सोसायटीच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी लोकमान्य सोसायटीचे संचालक माननीय श्री. पंढरी परब, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री. दत्ता सामंत, वेंगुर्ले पंचायत समितीचे उपसभापती श्री. सचिन देसाई, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश सामंत, श्री. आनंद सामंत, लोकमान्य सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. महेश तानावडे, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. नित्यानंद मांजरेकर, परुळे शाखा व्यवस्थापिका सौ. गौरी सामंत, रिजनल मार्केटिंग मॅनेजर सौ. साक्षी मयेकर यांच्यासह मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, लोकमान्य सोसायटीचे अधिकारी-कर्मचारी आणि दशावतारप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परुळे शाखा व्यवस्थापिका सौ. गौरी सामंत यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील सामाजिक व सांस्कृतिक उद्देश स्पष्ट करताना दशावतार या लोककलेचे महत्त्व विशद केले. तसेच लोकमान्य सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांची आणि लोककल्प फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना उभारी देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना लोकमान्य सोसायटीचे संचालक श्री. पंढरी परब यांनी लोकमान्य सोसायटीच्या कार्याचा आढावा घेतला. लोकमान्य सोसायटीच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. दत्ता सामंत यांनी संस्था आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम राबवत असल्याबद्दल विशेष अभिनंदन व आभार व्यक्त केले. लोककल्प फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला मदत करण्यासाठी तसेच स्थानिक लोककला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या ‘हयग्रीवासूर संहार’ या संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, प्रभावी संवादफेक, संगीत, अभिनय आणि दशावताराच्या वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणातून कलाकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमस्थळी उत्साहाचे आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रुती राऊळ यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवर, कलाकार, रसिक प्रेक्षक, सहप्रायोजक तसेच कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार लोकमान्य सोसायटीच्या रिजनल मार्केटिंग मॅनेजर सौ. साक्षी मयेकर यांनी मानले.
