पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : म्हैसूरमध्ये विवेक स्मारकाचे उद्घाटन
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
युवक ही देशाची सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलेले भारताचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे. उत्पादन, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, अवकाश, क्रीडा यासारख्या सर्व क्षेत्रातील तरुणांची कामगिरीच भारताला जगाच्या अग्रस्थानी नेत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
म्हैसूर येथील श्री रामकृष्ण आश्रमात उभारण्यात आलेल्या विवेक स्मारकाचे (स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र) उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आपल्या म्हैसूर हे भारताचे एक प्राचीन सांस्कृतिक केंद्र आहे. येथील ऐतिहासिक दसरा, राजवाडे, संगीत, साहित्य आणि धार्मिक वारसा यांना देशाच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील म्हैसूरचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले.
स्वामी विवेकानंदांनी आपल्या प्रवासात विदेशातील तरुण त्यांच्या देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करताना पाहिले. त्यावेळी भारत गुलामगिरीत होता. पण आज भारतातील तरुण आपल्या प्रतिभेने आणि मेहनतीने देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. भारताने गेल्या 12 वर्षांत अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाईल उत्पादन करणारा देश आहे. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये तो जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. देशात सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन सुरू झाले आहे. भारतीय तरुण आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), अंतराळ, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये एक नवा अध्याय लिहित आहेत. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे. ‘मेक इन इंडिया’सह अनेक योजनांच्या यशामागे तरुणांचे प्रयत्न आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाला प्राधान्य आहे
गेल्या 12 वर्षांत देशात 650 हून अधिक नवीन विद्यापीठे, 14 हजारांहून अधिक महाविद्यालये, 4 हजारांहून अधिक आयटीआय सुरू करण्यात आले आहेत. 9 आयआयएम, 7 आयआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत. वार्षिक एमबीबीएस जागांची संख्या वाढून 1.40 लाख झाली आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 838 वर पोहोचली आहे,. देशभरात 14 हजार पीएमश्री शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिवकुमार यांनी पंतप्रधानांचे केले स्वागत
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी म्हैसूरमध्ये सुमारे 45 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले स्वामी विवेकानंद स्मारक आणि सांस्कृतिक युवा केंद्र जनतेला समर्पित केले. त्यानंतर त्यांनी आश्रमात काही वेळ ध्यान केले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी रामकृष्ण आश्रमाच्या परिसरात रोपट्याचे रोपण केले. तत्पूर्वी नवी दिल्लीहून म्हैसूरच्या मंडकळ्ळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. तेथून विशेष हेलिकॉप्टरने ओव्हल मैदानावर उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्वागत केले.
