Headlines

मुंबई-पुणे रेल्वेमार्गासाठी नवा प्रकल्प, कर्जत ते लोणावळादरम्यान आपत्कालीन रस्ता उभारणार; मध्य रेल्वेचा निर्णय| Maharashtra Times


म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वे घाटमार्गात अतिवृष्टी, दरड कोसळणे आणि आपत्कालीन स्थितीत खोळंबलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेने अखेर पावले टाकली आहेत. कर्जत ते लोणावळादरम्यान २६ किलोमीटर लांबीचा आपत्कालीन रस्ता तयार करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे. घाटात रेल्वेमार्ग बंद झाल्यावर, तात्काळ मदत पोहोचण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.

तिसऱ्या मार्गिकेचं काम अपूर्ण

मुंबई-पुणे रेल्वेमार्गातील कर्जत ते लोणावळा घाट मार्गात ६ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. त्यामुळे घाटातील तीन मार्गिका पूर्णपणे बाधित झाल्याने रेल्वे वाहतूक थांबली होती. सध्या दोन मार्गिका पूर्ववत करून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र तिसऱ्या मार्गिकेचे काम अद्याप अपूर्ण असल्याने त्यावरील रेल्वे वाहतूक बंदच आहे. दरम्यान, घाटात पोहोचण्यासाठी केवळ रेल्वेमार्गच असल्याने पर्यायी मार्गासाठी रस्ता उभारण्यात येणार आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज

आपत्कालीन स्थितीत वापरण्यासाठी कर्जत ते लोणावळा दरम्यान रेल्वे मार्गालगत रस्ता उभारण्यात येणार आहे. २६ किलोमीटर लांब आणि एका वेळी दोन वाहने ये-जा करू शकतील, एवढी रस्त्यांची रुंदी असणार आहे. सद्यस्थितीत रस्त्यांची आखणी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे बस आणि आपत्कालीन वाहनांनी अडकलेल्या रेल्वेगाड्यांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. अडकलेल्या प्रवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी नेणेही शक्य होईल. आपत्कालीन रस्त्यामुळे रुग्णवाहिकांसह वैद्यकीय सुविधा पोहोचवणे शक्य होणार आहे.

घाटातील तिसरी मार्गिका रेल्वे वाहतुकीसाठी खुली करण्याकरिता दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. दुरुस्ती आणि मजबुतीकरण केल्यानंतर आता सुमारे ५० ते ६० डंपरमधून ग्रॅन्युलर मटेरियलच्या मदतीने पाया भरण्यात येत आहे. भूस्खलन आणि अतिवृष्टीमुळे रुळांना आधार देणाऱ्या जमिनीचा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे त्यात भरणी करून त्याचे मजबुतीकरण सध्या सुरू आहे. रेल्वेशिवाय पर्यायी रस्ता नसल्याने रुळांवरील विशेष मालवाहू गाडीचा वापर या कामासाठी केला जात आहे.

तिसऱ्या मार्गिकेसाठी आठवडाभराची प्रतीक्षा

तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी आणखी आठवडाभर काम सुरू राहणार आहे. येत्या ३० जुलैपर्यंत मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आषाढीसाठी विशेष रेल्वे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मिरजदरम्यान एक मार्गी दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष गाडीचे आरक्षण ‘आयआरसीटीसी’सह सर्व आरक्षण केंद्रांवर सुरू झाले आहे.

Maharashtra TimesPune Shivajinagar Flyover: पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोंडी फुटणार, शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी ७३.५२ कोटी; १.५ वर्षांत मार्ग पूर्ण

गाडी क्रमांक ०११८३ विशेष गाडी २५ जुलै रोजी दुपारी ३.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११८१ विशेष गाडी २६ जुलै रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता सीएसएमटीहून रवाना होईल आणि त्याच दिवशी सकाळी ११.२५ वाजता मिरज येथे पोहोचेल. दोन्ही विशेष गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड कुर्डुवाडी आणि पंढरपूर येथे थांबे आहेत. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, आठ शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय आसनांसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशा एकूण १८ डब्यांसह विशेष गाड्या धावणार आहेत.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत