Headlines

मानखुर्द अपघातानंतर भयानक वास्तव समोर; रुग्णवाहिकांचा प्रतिसाद नाही, पोलिस गाडीतून जखमींना रुग्णालयात नेण्याची वेळ| Maharashtra Times


Mankhurd Bus Accident: मानखुर्द रेल्वे स्थानक पुलावर सोमवारी क्रमांक ५०१ बसचा भीषण अपघात झाल्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून जखमी व मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकांना संपर्क केला जात होता. परंतु, सार्वजनिक व खासगी रुग्णवाहिकांचा प्रतिसाद नाहीच मिळाला अशी माहिती समोर आली आहे.

मानखुर्द बस अपघात
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बेस्ट बसचा अपघात झाल्यानंतर रुग्णवाहिकांचा प्रश्न अधोरेखित झाला. जखमींनी त्याही अवस्थेत सार्वजनिक, खासगी रुग्णवाहिकांची सेवा देणाऱ्या संस्थांना संपर्क केला, मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. १०८ क्रमांकावरही सातत्याने संपर्क साधून उत्तर मिळाले नाही. अखेर पोलिसांच्या गाडीतून मृतदेह आणि जखमी यांना एकत्र रुग्णालयामध्ये नेण्यात आले.

मुंबई शहराची एकूण लोकसंख्या आणि विस्तार पाहता १०८सह इतर रुग्णवाहिकांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, तरीही ही सुविधा आम्हाला उपलब्ध का झाली नाही, असा संतापजनक प्रश्न जखमींसह त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये एकूण १०८ रुग्णवाहिका आहेत. मानखुर्द रेल्वेस्थानकाबाहेर, तसेच शताब्दी रुग्णालयाच्या बाहेरही या रुग्णवाहिका उभ्या असतात. त्यादेखील या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांसाठी धावून आल्या नाहीत. ‘पहिला कॉल ८.३० वाजता आल्यानंतर तो लगेच रद्द केला. पुन्हा कॉल आला तेव्हा आम्ही रुग्णवाहिका पाठवली,’ अशी माहिती १०८ रुग्णवाहिकेचे मुंबई शहरातील केंद्रीय समन्वयक डॉ. आशुतोष यांनी दिली. वाहतूककोंडीमुळे उशीर झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली. नेमके कारण काय होते, याची चाचपणी करण्यात येईल, असेही समन्वयकांनी ‘मटा’ला सांगितले. मदत मागण्यासाठी फोन केला असता, तो रद्द कसा करण्यात येईल, याचे कोणतेही समाधानकारक उत्तर त्यांना देता आलेले नाही.

Maharashtra TimesMumbai BEST Bus Accident: ‘खिशात फक्त २०० रुपये, उपचार कसे करू?’ बेस्ट अपघातानंतर जखमी हतबल; बस व्हिडीओ गेमसारख्या वेगात चालवल्याचा दावा

या अपघातामध्ये जखमी झालेली अंकिता जाधव हिच्या पालकांसह रुक्मिणी घोरपडे, लता वाघेला यांच्या कुटुंबीयांनीही हा प्रकार अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. ‘रुग्णवाहिका आली नाही. पोलिसांकडे आर्जव केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनातून रुग्णालयामध्ये आणले. सार्वजनिक रुग्णवाहिकांची सुविधा २४ तास उपलब्ध असते. आठ जण एकाच ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडलेले असताना मदत त्वरित का मिळाली नाही,’ असा व्यथित प्रश्न उपस्थित केला. खासगी रुग्णवाहिकांनी येथे येण्यासाठी सहा ते सात हजार रुपये मागितले.

रिक्षाला वाचवायला गेलो…

समोर अचानक रिक्षा आल्याने त्या रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशांचा अपघात होऊ नये, यासाठी त्यांना वाचवायला गेलो, मात्र बस पुढे जाऊन आपटली. त्यानंतर काय झाले ते आठवत नाही, असे राजावाडी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार घेत असलेला बसचालक बनवारीलाल शर्मा (४९) यांनी सांगितले. बसवाहक वैभव सुखदेव वाघमारे (४१) यांच्या कपाळाला जखम झाली असून याविषयी काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. गोवंडी येथे वैद्यकीय उपचार घेत असलेले शंकर साकेत यांना काही वैद्यकीय चाचण्यांसाठी लो. टिळक रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते.

Maharashtra TimesMumbai BEST Bus Accident: भरधाव ‘बेस्ट’ थेट दुभाजकावर धडकली, ६५ वर्षीय पादचाऱ्याचा जागीच अंत; सायन-पनवेल महामार्गावर भीषण अपघात

बेस्टचा सुरक्षित प्रवास वाऱ्यावर

मानखुर्द येथे सोमवारी झालेल्या बेस्ट बसच्या अपघातानंतर बेस्ट उपक्रम आणि भाडेतत्त्वावर बस पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवकांकडून रोष व्यक्त करण्यात आला. पूर्वीचा बेस्टचा सुरक्षित प्रवास आता वाऱ्यावर असल्याची टीका सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा