शहर वार्ताहर/कुडाळ : पिंगुळी-पाट मार्गावर माड्याचीवाडी करमळगाळू पापडी येथील कॉजवे खचल्यामुळे कॉजवेला एका बाजूने भले मोठे भगदाड पडले आहे. अद्याप या ठिकाणी बांधकाम विभागाकडून उपायोजना अथवा वाहनधारकांसाठी सूचना फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणत्याहीक्षणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात भगदाड पडते. मात्र तेथील ग्रामस्थांकडून मागणी होत नसल्याने सा. बां. विभागाकडून नुसती मलमपट्टी केली जात आहे. कॉजवेला पडले भगदाड तात्काळ बुजवून रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
पिंगुळी-पाट रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. परुळे-चिपी विमानतळाकडे जाणारा तसेच खवणे, निवती समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणारा हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. एसटी बस तसेच अवजड वाहनांची सध्या या कॉजवेवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. त्यामुळे या कॉजवेचा उर्वरित भाग खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. कॉजवेला पडलेल्या भगदाडामुळे रात्रीच्यावेळी अपघातही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लहान वाहन धारकांना तर मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या या कॉजवेच्या ठिकाणी वाहनधारकांना इशारा म्हणून ग्रामस्थांनी झाडाच्या फांदया ठेवल्या आहेत. त्यामुळे वाहनधारक सध्या घाबरून एका बाजूने वाहतूक करीत आहेत.
दरम्यान गेल्यावर्षीही या कॉजवेच्या एका बाजूला भगदाड पडले होते. त्याच बाजूला यावर्षी पुन्हा भगदाड पडले आहे. त्यामुळे हा कॉजवे कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या कॉजवेची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहन धारकांमधून होत आहे.
