Headlines

महाबळेश्वर पाचगणीतील शिबिरानंतर भास्करराव कोणती क्रांतीची मशाल आणणार? वैभव खेडेकर यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण


भाजप नेते वैभव खेडेकर यांनी भास्कर जाधव यांच्या महाबळेश्वर पाचगणी येथील कार्यकर्ता शिबिरवर भाष्य करताना सूचक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Konkan Politics
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : “उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी आजवर राजकीय जीवनात अनेक क्रांती घडवलेल्या आहेत. पण आता महाबळेश्वर पाचगणी येथे त्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शिबिर सुरू आहे. पण हे श्रावणापूर्वीचे पावसाळ्यातील आखाडा किंवा जेवण असावं”, असा मिश्किल अंदाज व्यक्त करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी भविष्याच्या संभाव्य राजकीय भूकंपाचे संकेत दिले.

वैभव खेडेकर नेमकं काय म्हणाले?

“राजकारणाच्या बाबतीत महाबळेश्वर हे एक असं ठिकाण आहे की, तिथे राजकीय बैठकीनंतर कायम क्रांती घडली आहे. त्यामुळे आता मला माहिती नाही भास्करशेठ क्रांतीची मशाल महाबळेश्वरवरून घेऊन येतात की नाही. पण महाबळेश्वरची भूमी ही राजकारणासाठी क्रांतिकारी राहिली आहे. भविष्यात आपण त्याची वाट पहावी”, अशी सूचक प्रतिक्रिया वैभव खडेकर यांनी दिली आहे.

कोकणात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

वैभव खडेकर यांनी दिलेल्या या खळबळजनक प्रतिक्रियेनंतर कोकणात पुन्हा एकदा भविष्यात राजकीय भूकंप घडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तसेच यावरून आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रमोद जठार यांची भास्कर जाधवांना ऑफर

गेल्या 15 दिवसांपूर्वी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्र्याचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती यानिमित्त चिपळूण येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी भास्कर जाधव आणि प्रमोद जठार यांची भेट झाली होती. यावेळी प्रमोद जठार यांनी भास्करराव तुमच्यासारखा नेता आम्हाला कोकणात हवा आहे, असं सूचक विधानही केलं होतं.

जठार काय म्हणाले होते?

“उबाठामध्ये त्यांना काही काम दिले जात नाही. ते नाराज आहेत. त्यांचा ज्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे तसा करुन घेतला जात नाही. त्यांना विरोधी पक्षनेता सुद्धा करत नाहीत, म्हणून भास्करराव जाधव यांनी आता विचार करावा. कोकणामध्ये भास्करराव तुमच्यासारखा नेता आम्हाला हवा आहे”, असं म्हणत प्रमोद जठार यांनी भास्कर जाधवांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती. यानंतर आता भाजपचे वैभव खेडेकर यांनी असंच काहीसं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाबळेश्वरच्या बैठकांचा राजकीय इतिहास काय आहे?

“एकेकाळी एकत्रित असलेल्या शिवसेनेचे महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनातच कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतरच तिथे दुफळी माजली गेली”, असं वैभव खेडेकर म्हणाले.

“त्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या वेळेला शिवसेना सोडली त्यावेळेला देखील आमची बैठक वर्षापूर्वी महाबळेश्वर येथे घेतली होती आणि तिथून क्रांती घडली. मनसेची निर्मिती झाली”, अशाप्रकारे महाबळेश्वर पाचगणी येथील बैठकांचे यापूर्वीचे संदर्भ देत वैभव खेडेकर यांनी भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरावर संभाव्य शक्यतांबाबत सूचक वक्तव्य केल्याने भविष्यात कोकणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न अनेक राजकीय निरीक्षकांना पडला आहे.

‘राज ठाकरेंच्या हाती फारसं काही लागणार नाही’, खेडेकर यांचं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 9 ऑगस्ट रोजी कोकणातील दक्षिण रायगड जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर वैभव खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्या महामार्गाची पाहणी करण्यासाठी राज ठाकरे येत आहेत ते पाहता त्यांच्या हाती काही लागणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्ग पूर्ण केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये त्यांना फार खड्डे किंवा फार काही पाहायला मिळेल, असं वाटत नाही”, अशा शब्दांत भाजपचे जिल्ह्यातील नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सुनावले आहे.

पूर्वाश्रमी मनसेमध्ये राज्य सरचिटणीस असलेले वैभव खेडेकर यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांचा पहिलाच कोकण दौरा असल्याने राज ठाकरे या काय बोलतात? याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.