Headlines

मसुरे डांगमोडे रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार


मसुरे प्रतिनिधी : मसुरे डांगमोडे ते मालडी या सुमारे ४ ते ५ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ग्रामस्थांना पायी चालणेही कठीण झाले आहे. तसेच एसटी बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही कार्यवाही न झाल्याने अखेर गुरुवारी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी उपअभियंता प्रदीप भोसले व कनिष्ठ अभियंता साई चव्हाण यांना घटनास्थळी बोलावून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यात आला. ग्रामस्थांनी रस्त्यावरील चिखल, अपघातांचा धोका, विद्यार्थ्यांची गैरसोय आणि आरोग्य सुविधांवरील परिणाम याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तीन वर्षांनंतरही रस्ता आणि मोरीचे काम अपूर्ण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रकाश ठाकूर, हरी ठाकूर, राजेंद्र ठाकूर आदी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर विविध प्रश्न उपस्थित करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

ग्रामस्थांनी रस्ता तात्पुरता सुस्थितीत आणण्यासाठी तसेच कामाला गती देण्यासाठी निवेदन सादर केले. येत्या चार ते पाच दिवसांत रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, या कालावधीत ठोस कार्यवाही न झाल्यास बांधकाम विभाग मालवण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, माजी उपसरपंच मसुरे पिंट्या गावकर, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडेचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठाकूर, परशुराम ठाकूर, महेश ठाकूर, राजेंद्र ठाकूर, बुधाजी ठाकूर, अशोक चव्हाण, किशोर ठाकूर, जुबेर सय्यद, खलील सय्यद, फारुख काझी, आसिफ शेख, प्रशांत चव्हाण, हरी ठाकूर, स्वप्निल ठाकूर, गुरुनाथ ठाकूर, मंगेश ठाकूर, सोमा ठाकूर, आदी सहित डांगमोडे, मालडी, मसुरे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत