छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
देशभरात CJP कडून भाजपविरोधी भूमिका आक्रमकपणे मांडली जात असताना, शिवसेना (शिंदे गट)चे नेते तथा प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी CJP नेते अभिजित दिपके यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजप हा महायुतीतील प्रमुख पक्ष असताना, त्याच आघाडीतील शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्याने भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्याची भेट घेऊन त्यांचा सत्कार केल्याने अनेक राजकीय प्रश्न उपस्थित होत आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, “शिंदे गटाचे नेमके चालले काय?” हा प्रश्न आता महायुतीतही चर्चेचा विषय ठरला आहे. एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे सातत्याने कौतुक करत असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षातील महत्त्वाचे नेते बच्चू कडू यांनी अभिजित दिपके यांची घेतलेली भेट वेगळाच राजकीय संदेश देत असल्याची चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे विलिनीकरण करून शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी मिळाली. त्यामुळे आता ते शिंदे गटाच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात.

आपल्या आक्रमक आंदोलनशैलीसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांच्या या भेटीमागे नेमका काय राजकीय संदेश आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. महायुतीत ‘शह-काटशह’चे राजकारण सुरू आहे का? की हा केवळ सदिच्छा भेटीचा भाग होता? याबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले असून, येत्या काळात यावर संबंधित पक्षांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावेळी छत्रपती संभाजी नगरचे शहर अध्यक्ष कुणाल राऊत, महेश बडे,सुधाकर शिंदे, संकेत खापर्डे, विश्व्दीप कारंजीकर, झुबेर शेखं हे उपस्तित होते.
मी शेतकरी, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांसाठी शेकडो आंदोलने केली यादरम्यान माझ्यावर अनेकदा लाठी चार्ज व आजपर्यंत साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आहेत. मी एक आंदोलन असून सामान्य कार्यकर्त्याच्या भावना जाणारा कार्यकर्ता आहे. म्हणून मी माझ्या वैयक्तिक भेटीसाठी जाऊन अभिजीत दिपके यांचे अभिनंदन केले. – बच्चू कडू
