Headlines

भवानीनगर परिसरात चोरट्यांची दहशत


रविवारी मध्यरात्री तासभर वावर : पाच जणांचे टोळके सीसीटीव्हीत कैद

 त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : शहर व उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नित्यानंद कॉलनी, भवानीनगर परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांच्या एका टोळीने अक्षरश: दहशत माजविल्याचे सामोरे आले आहे. चोरट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकारामुळे स्थानिक नागरिक थक्क झाले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार रविवारी मध्यरात्री 2.45 ते 3.45 या वेळेत तब्बल तासभर पाच जणांच्या एका टोळीने नित्यानंद कॉलनी, भवानीनगर परिसरात दहशत माजवली. वेगवेगळ्या इमारतीत शिरून चोरीसाठी बंद घरांची टेहळणी केली आहे. भवानीनगर येथील भवानी मंदिराजवळ एका घरात चोरीही झाली आहे.

या घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेसंबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता. तब्बल तासभर पाच जणांच्या टोळीने परिसरातील अनेक घरांबाहेर जाऊन पाहणी करूनही या टोळीच्या हालचाली कोणाच्या लक्षात आल्या नाहीत. नित्यानंद कॉलनी येथील एका घरासमोर चोरटे चोरीसाठी दाखल झाले. त्यावेळी सेन्सरमुळे लाईट लागताच चोरटे तेथून पसार झाले. काही घरात संरक्षक भिंतीवरून उडी मारून दरवाजातही पाहणी केल्याचे फुटेजवरून दिसून येते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.

शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. भवानीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहता अत्यंत निर्भयपणे चोरटे एकाच परिसरात तब्बल तासभर वावरत होते, हे दिसून येते. यासंबंधी बेळगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत