त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : सार्वजनिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनडब्ल्यूकेआरटीसीतर्फे 1 ऑगस्टपासून बेळगाव-ठाणे, बेळगाव-धर्मस्थळ व बेळगाव-बेंगळूर या मार्गांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नव्या स्लीपर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून निश्चित करण्यात आलेल्या वेळेत या बेसेस धावणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव-ठाणे मार्गावर ‘राजरथ“ ही एसी स्लीपर बस सुरू होत असून 1,250 रुपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बस दररोज रात्री 8.15 वाजता बेळगावहून सुटून संकेश्वर, निपाणी, कोल्हापूर, पुणे मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता ठाणे येथे पोहोचेल. परतीची बस ठाणे येथून रात्री 8 वाजता सुटून सकाळी 6.45 वाजता बेळगावला दाखल होणार आहे.
बेळगाव-धर्मस्थळ मार्गावर ‘पालखी“ नॉन एसी स्लीपर बससेवाही सुरू करण्यात येत असून यासाठी 1,150 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. बस रात्री 8.30 वाजता बेळगावहून सुटून हुबळी, अंकोला, कुमटा, भटकळ, कुंदापूर, उडुपी, मूडबिद्री मार्गे धर्मस्थळ येथे पोहोचेल. धर्मस्थळाहून रात्री 8.30 वाजता परतीची सेवा उपलब्ध असणार आहे.
या तिन्ही बससेवांसाठी एनडब्ल्यूकेआरटीसीच्या संकेतस्थळांवर जाऊन ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मध्यवर्ती बसस्थानकातील आरक्षण काऊंटरवर जाऊन तिकिट बुकिंग करता येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन एनडब्ल्यूकेआरटीसीतर्फे करण्यात आले आहे.
बेळगाव-बेंगळूर मार्गावर ‘राजरथ’
याशिवाय बेळगाव-बेंगळूर मार्गावर ‘राजरथ“ एसी स्लीपर बससेवा सुरू होत असून 1,300 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. बस रात्री 8.45 वाजता बेळगावहून सुटून धारवाड व हुबळी मार्गे सकाळी 6.45 वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे. बंगळूरहून रात्री 11.15 वाजता सुटणारी बस दुसऱ्या दिवशी सकाळी 9.15 वाजता बेळगावला पोहोचेल.
