Chhatrapati Sambhaji Nagar News: जालना रोडवर एसटी महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाल्याने अडीच तास वाहतूक खोळंबली.एसटी चालकांकडे जॅक मागितला असता .जॅक दिला नाही परिणामी दीड लाख वाहनांना वाहतूक कोडींचा फटका बसला .

वाहनाधारकांची धांदल उडाली
ऐन रहदारीची वेळ आणि जवळपास दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या. एरवीही जालना रोडवरून प्रवास करणाऱ्या शहरवासीयांना हे नित्याचेच असले तरी मंगळवारी सकाळी मात्र वाहनाधारकांची चांगलीच धांदल उडाली. मोंढा नाका उड्डाणपुलावर एसटी महामंडळाच्या बसचे टायर पंक्चर झाले आणि थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल अडीच तास वाहतूक खोळंबली.
नागरिकांना वेळेचा, अतिरिक्त इंधन जाळण्याचा फटका तर बसलाच, जवळपास एक लाख चाळीस हजार वाहने या मोठ्या वाहतूककोंडीत अडकली. विशेष म्हणजे या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या एसटी बस घ्यायला तयार नसल्याने हे प्रवासीही यात अडकून पडली.
आणि एकच गोंधळ सुरू झाला.
छत्रपती संभाजीनगरच्या मधोमध जाणारा जालना रोडवरची वाहतूक सुरळीत आहे. कुठलाही त्रास नाही असे खूप ‘कमी’ वेळा होते. बहुतांश वेळा या रस्त्यावर काही ना काही अडथळा असतो आणि या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. मंगळवारी सकाळी अकरा-साडे अकरा दरम्यान मेहकर-त्रिंबकेश्वर या एसटी बसच्या समोरील उजव्या बाजूचे टायर पंक्चर झाले आणि एकच गोंधळ सुरू झाला.
Maharashtra Rain: खरीप पेरण्या ८२ टक्केच! राज्यात पावसाचा वेग वाढूनही शेतीच्या कामांची गती मंदावली
अखेर वाहतूक पूर्वपदावर आली.
बसच्या समोरच्या बाजूचा टायर पंक्चर झाल्याने दोन जॅक आवश्यक होते, पण बसमध्ये एकच जॅक असल्याने ड्रायव्हरला पंक्चर काही काढता येईना. इकडे हळूहळू जालना रोडवर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. सेव्हन हिलकडून येणाऱ्या वाहनांना पुढे वाहतूक कोंडीझाल्याची माहिती नसल्याने ती बिचारी या वाहतूक कोंडीत अडकली. इकडे या बंद पडलेल्या एसटीच्या चालकाकडे एसटीच्या मुकुंदवाडी वर्कशॉपमधून जॅक येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास पंक्चर काढल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.
पर्यायी रस्त्यांवरही कोंडी
आकाशवाणी केंद्रापासून पुढे अमरप्रीत चौकापर्यंत व मोंढा नाका उड्डाणपुलावर रस्त्याच्या जालना रोडच्या एका बाजूने वाहने अतिशय संथगतीने पुढे जात होती. अखेर सिंधी कॉलनीतील गुरूद्वारासमोरून, सिंधी कॉलनीमार्गे बालाजीनगर, पुढे टिळकनगर, रोपळेकर चौक, श्रेयनगरमार्गे असा अजूनच लांब पल्ल्याचा मार्ग निवडत काही वाहनधारक या कोंडीतून बाहेर पडली खरी, पण यासाठी त्यांनाही किमान दोन किलोमीटरचा फेरा पडला. विशेष म्हणजे या सगळ्या छोट्या रस्त्यांवरही गर्दी झाली होती.
एसटी बसने काढता पाय घेतला.
बसमध्ये एकच जॅक असल्याने चालक, येणाऱ्या इतर एसटी चालकांकडे जॅक मागत होते, पण जॅकचे नुकसान झाले तर चालकाला जबाबदार धरले जात असल्याने मागून येणाऱ्या एसटीने या अडकलेल्या बसला जॅक दिला नाही. अडकलेल्या बसचे प्रवासीही मागून येणाऱ्या एसटींनी घेतले नाहीत. पुढच्या प्रवाशांचे सीट आरक्षित असल्याने यांना पुढे कसे न्यायचे म्हणत एसटी बसने काढता पाय घेतला. या प्रकाराने या बसचे चालक-वाहक घामाघूम झाले होते.

