Headlines

पुण्यात आरएसएसच्या संघ शिक्षा वर्गाचा समारोप:हिंदू संघटन संहारक नाही, तर संरक्षक; भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी पुण्यात प्रतिपादन केले की, हिंदूंचे संघटन कोणाच्याही विरोधात नाही, तर ते शांतता, सत्य आणि न्यायाच्या मार्गाने चालणारा समाज घडवण्यासाठी आहे. जगाच्या कल्याणासाठी उभी राहिलेली ही संघटित शक्ती संहारक नसून, नेहमीच संरक्षक भूमिका बजावणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित ‘संघ शिक्षा वर्गाचा’ प्रकट समारोप कार्यक्रम केसरीवाडा येथे पार पडला. या समारोहात भैय्याजी जोशी मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी उच्च ऊर्जापदार्थ संशोधन प्रयोगशाळेचे (एचईएमआरएल) समूह संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ. हिमांशू शेखर, वर्गाधिकारी दत्तात्रेय गर्गे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. नाना जाधव आणि कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव उपस्थित होते. भैय्याजी जोशी यांनी पुढे सांगितले की, जगात एकही मुस्लिम किंवा ख्रिश्चन नसता, तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू झालेच असते. कारण संघाचे कार्य कोणाविरुद्ध नसून हिंदू समाजातील सकारात्मक ऊर्जा जागृत करण्यासाठी आहे. सज्जनशक्ती संघटित करून समाज परिवर्तन घडवणे हाच संघाचा मूळ हेतू आहे. समाजाला केवळ उपासना धर्मापुरते मर्यादित न ठेवता, आचरण आणि त्या माध्यमातून राष्ट्रधर्माकडे न्यायचे आहे. भारताच्या उत्थानातूनच जगाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा होणार आहे, असेही ते म्हणाले. डॉ. हिमांशू शेखर यांनी आपल्या भाषणात संघाच्या या वर्गाला उपस्थित राहणे हे आपले भाग्य असल्याचे म्हटले. स्वयंसेवकांना शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर भारताशी जोडण्याचे उत्तम कार्य येथे केले जाते. भारताच्या सर्वांगीण विकासात स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमोद कालगावकर यांनी वर्गाची माहिती दिली. या शिक्षण वर्गात संपूर्ण महाराष्ट्रातून ७५ शिक्षार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून ५२, कोकणातून १७, देवगिरीतून ५ आणि विदर्भातून एका शिक्षार्थ्याचा समावेश होता. या वर्गासाठी ११ पूर्णवेळ शिक्षक आणि १५ स्वयंसेवक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पदवी आणि पदव्युत्तर वयोगटातील या वर्गात अभियांत्रिकी, विधी (कायदा) आणि वैद्यकीय अशा व्यावसायिक क्षेत्रांतील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. या वर्गादरम्यान सेवाभाव जागृत करण्यासाठी श्रमसाधना, तसेच पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्षारोपण करण्यात आले. प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी कागदी पिशव्या बनवणे आणि कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. याशिवाय, शिक्षार्थ्यांचा आत्मविश्वास आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष वक्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. ॲड. प्रशांत यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले. भारताला कोणीही संपवू शकत नाही – भैय्याजी “महर्षी अरविंदांनी भारताला ‘मृत्युंजय भारत’ म्हटले आहे, तर स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक भारतीयाचा ‘अमृतपुत्र’ म्हणून गौरव केला आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताला संपवू शकत नाही, हे आमचे स्वप्न नसून वास्तव आहे. हिंदू विचार घेऊन चालणारा हा समाज अनादी आणि अनंत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे, ‘अनादी मी, अनंत मी, अवध्य मी…’ या हिंदू विचाराला कोणीही कधीही नष्ट करू शकणार नाही. हा विचार संकुचित नसून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कल्पना करणारा आहे,” असा विश्वास भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केला. ‘नकारात्मक विचार टिकत नाही संघाच्या शतकोत्तर प्रवासाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “संघ संपवण्याची भाषा करणारे स्वतः संपले. १९२५ मध्ये संघाचे कार्य सुरू झाले आणि १९२६ मध्ये साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे काम सुरू झाले. आज १०० वर्षांनंतर साम्यवादी शोधूनही सापडणार नाहीत, तर संघ एका शक्तीच्या रूपाने जागतिक मंचावर उभा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे संघाने नेहमीच सकारात्मक दृष्टी ठेवली. हिंदू चिंतनातून आलेली ही सकारात्मक दृष्टी जगभरात उभी करणे हेच संघाचे ध्येय आहे.”

विषमता मिटवण्यासाठी समाजाची शक्ती हवी : “स्वातंत्र्यानंतर देशाने सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली असली, तरी अजूनही समाजातील दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत विकास पोहोचलेला नाही. आजही देशात कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण चिंतेचा विषय आहे. विकासाचे हे मोठे कार्य केवळ सरकार एकटे करू शकत नाही; त्यासाठी समाजाची संघटित शक्ती पुढे येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेमकी हीच जनशक्ती जागृत करण्याचे काम करत आहे,” असेही भैय्याजी जोशी यांनी नमूद केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत