Headlines

पाडळीत ठाकरवाडी रस्त्यावर चिखल:ग्रामस्थ, विद्यार्थी त्रस्त; राया फाउंडेशनसह पालकांचे प्रशासनाला निवेदन‎




सिन्नर तालुक्यातील पाडळी गावातील मारुती मंदिरापासून ठाकरवाडी वस्तीकडे जाणारा प्रमुख रस्ता सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, पावसामुळे तो पूर्णपणे चिखलमय झाला आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. या रस्त्यावरून दररोज ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत असून अनेकदा घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांनाही शेतीची अवजारे, ट्रॅक्टर, दुचाकी व इतर वाहने घेऊन जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आदिवासी वस्तीतील ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे मागणी केली. प्रत्येक वेळी रस्ता मंजूर झाला आहे. “निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू होईल’ अशी आश्वासने देण्यात आली. मात्र, एक ते दोन वर्षे उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने मंजूर झालेला रस्ता केवळ कागदावरच आहे का, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. काही वेळा रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यालगतच्या दोन्ही बाजूंचे शेतकरी सहमतीने रस्ता करून देण्यास तयार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काम रखडण्यामागचे नेमके कारण काय, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या पावसाळ्यामुळे किमान तात्पुरता उपाय म्हणून या रस्त्यावर तातडीने मुरूम टाकून तो वाहतुकीयोग्य करावा. तसेच कायमस्वरूपी रस्त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून मंजूर काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष हिरामण आगिवले, शांताराम रेवगडे, भगीरथ रेवगडे, योगेश रेवगडे यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत