Headlines

‘नवऱ्याच्या आईचं एक विश्व तयार असतं, सून म्हणून आपलं हळूहळू उभं करायचं असतं, सासूबाईंसमोर मत मांडताना दडपण येतं’, नात्यांबद्दल काय म्हणतेय हृता दुर्गुळे?


प्रत्येक कलाकाराच्या प्रवासात काही भूमिका अशा असतात, ज्या केवळ साकारल्या जात नाहीत, तर जगल्या जातात. हृता दुर्गुळे दुर्गुळे हिच्यासाठीही हा प्रवास असाच राहिला आहे. सहज अभिनय, प्रयोगशीलता आणि प्रत्येक माध्यमात स्वतःला नव्यानं सिद्ध करण्याची जिद्द यामुळे तिनं प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. त्या प्रवासातील अनुभव, नात्यांची नव्यानं झालेली उकल आणि अभिनयाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी तिच्याशी साधलेला हा खास संवाद.

व्यक्तिरेखेशी ‘कनेक्ट’ झाले

मी मराठी झी फाइव्हवरील ‘अगं आई, अहो आई’ ही सीरिज २०२२मध्ये चित्रित केली होती. तेव्हा माझं नुकतंच लग्न झालं होतं. त्यामुळे श्रेया कशाकशातून जात होती, तिच्या मनात काय-काय विचार येत होते, हे मी ‘रिलेट’ करू शकत होते. कारण वैयक्तिक आयुष्यात मी त्याच टप्प्यातून जात होते. माझाही शोध घेणं सुरूच होतं. त्या चौकटीत ‘फिट’ बसण्याचा तो प्रवास असतो. मलाही कधी-कधी आई, बाबा, सासूबाई यांच्यासमोर मतं मांडताना दडपण येतं. पण मी ती मांडते, हे श्रेया आणि माझ्यात साम्य आहे. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या आईचं एक विश्व तयार असतं, त्यात सून म्हणून आपल्याला आपलं हळूहळू उभं करायचं असतं. ती ‘स्पेस’ धुंडाळताना मजा आली. एकीकडे नाती जपायची असतात आणि दुसरीकडे स्वतःचंही काहीतरी उभं करायचं असतं. यातला समतोल सांभाळताना अनेक गोष्टी शिकता आल्या,

नात्याचं वेगळेपण स्वीकारलंय

कधी-कधी माझे आई-बाबा माझ नवरा प्रतीकचे लाड करतात, तेव्हा मला थोडं असुरक्षित वाटतं सासू-जावयाचं नातं वेगळंच असतं. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर या नात्याचं वेगळेपण मी ओळखलं आहे, ते स्वीकारलं आहे, त्यामुळे मला असुरक्षित वाटत नाही. हीच नात्यातील असुरक्षितता सीरिजमध्ये कोणालाही खलनायक न करता दाखवण्यात आली आहे, त्यामुळे ती अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

Maharashtra TimesSunny Deol: ‘भारत आमची आई,तर पाकिस्तान मावशी’, ‘बटवारा १९४७’ ची राजकीय चर्चा नको; सनी देओलनं सांगितली वडिल धर्मेंद्रंची आठवण
कात्रीत सापडलेली पिढी

‘तुला काय कळतं?’ असं अनेक ठिकाणी बोलताना मी ऐकलंय. पण माझ्या घरात असं बोलण्यापेक्षा मला जे कळत नाही ते शिकवलं गेलं. त्याच्याही पुढे जाऊन माझी पिढी अशा कात्रीत सापडली आहे की, कळत नसलं तरीही प्रॉब्लेम असतो आणि सगळं कळत असेल, तर हिला सगळ्यातलं सगळं कळतं याचाही प्रॉब्लेम असतो. यातून मला खरंच कळत नाही की, कसं वागायचं? हा आमच्या पिढीसमोर असलेला मोठा प्रश्न आहे. पण तुला काय कळतं? असं बोलल्या जाणाऱ्या वातावरणात मी वाढले नाही, याचं समाधान अधिक आहे. माझे आर्थिक व्यवहार माझा भाऊ पाहतो. त्याबाबतीतलं मला खूप कमी कळतं, पण माझा भाऊ कधीच बोलला नाही की, तुला यातलं काय कळतंय? याची दुसरी बाजू म्हणजे, खरं तर मी ते सगळं शिकू शकते, पण मला जाणूनबुजून शिकायचं नाहीय, कारण मी गमतीनं नेहमी म्हणते, की त्यानिमित्तानं का होईना आम्ही व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलतो !

सर्व वयोगटातल्या स्त्रियांच्या कथा

मी मालिका, सिनेमा, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये स्त्रीप्रधान कथांचाच भाग होते, त्यामुळे ओटीटी आल्यावर स्त्रीप्रधान कथा जास्त प्रमाणात येऊ लागल्या असं सांगणं कठीण आहे. पण वेबविश्वामुळे फक्त विशीतल्या तरुणीचीच गोष्ट सांगितली जात नाहीय, तर वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांच्या कथा आणि व्यथा सादर केल्या जात आहेत. ही या माध्यमाची जमेची बाजू आहे. त्यामुळे आता या टप्प्यावर मला आईची भूमिका साकारावी लागेल, ही भीती अजिबात वाटत नाही. या माध्यमामुळे आत्मविश्वास मिळाला असल्यामुळे जोखीम पत्करण्याची शक्यता वाढली आहे.

Maharashtra TimesTharala Tar Mag : सायलीला अटक होताच महिपत गँगचा आनंदोत्सव, मंगळसूत्रावरुन तुरुंगात वाद; प्रियाची दादागिरी सुरू
…. म्हणून मी नाटक करते

माझ्यातला कलाकार जिवंत ठेवण्यासाठी मी नाटक करते. मालिका, सिनेमे केल्यानंतर कुठेतरी ‘कम्फर्ट झोन’ वाटू लागतो. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी रंगभूमीवर यावं लागतं. इथे आलात, की तुम्ही किती पाण्यात आहात हे कळतं. दडपणामुळे मी चांगलं सादरीकरण करते. नाटक करताना ते दडपण येतंच. मी आता मालिकेत काम केलं, तर प्रेक्षक ती हमखास बघतील. पण नाटक केलं, तर ते तिकीट काढून येतील का?, ही माझ्यासाठीही परीक्षाच असते. एक मात्र आहे, की आता करेन ते स्वतःच्या अटींवर ! म्हणूनच मी ‘ठरलंय फॉरेव्हर’ या नाटकाची सहनिर्मातीसुद्धा आहे.

हृता दुर्गुळे डेली शो का करत नाही ? स्वतः सांगितलं कारण

चांगले लेखक आहेत

आपल्याकडे चांगले लेखक नाहीत, असं मला वाटत नाही. अलीकडेच मी उत्तम लेखकांसोबतच काम केलंय. ‘दादा एक गूड न्यूज आहे‘ हे माझं पहिलं नाटक कल्याणी पाठारेनं लिहिलं होतं. आताचं ‘ठरलंय फॉरेव्हर’ अक्षता आचार्यनं लिहिलंय. गेल्या वर्षी मी दोन चांगले सिनेमे केले. त्याचं लेखन-दिग्दर्शन एकाच व्यक्तीनं केलं होतं. ‘अगं आई अहो आई’ ही वेगळ्या विषयावरची सीरिज कल्याणी पंडितनं लिहिली आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण लेखन करणारे लेखक आपल्याकडे आहेत, याचा मला अनुभव आहे.

मला गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात. मी आजवर कधीच नकारात्मक भूमिका साकारली नाहीय. मला कधीच कोणीच विचारलं नाहीय. पण मला खलनायिका वठवायची आहे. माझी झोप उडेल, असं काहीतरी मला साकारायचं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत