Headlines

नंबर-3 असो वा कुठलीही जागा, देशासाठी खेळणं महत्त्वाचं; देवदत्त पडिक्कल मालिकावीर पुरस्कारानंतर बोलताना काय म्हणाला?


Devdutt Padikkal IND vs SL Test, Player Of The Series : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन शतकांसह प्लेअर ऑफ द सीरीज ठरलेल्या देवदत्त पडिक्कलने आपल्या फलंदाजीच्या स्थानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. नंबर-३ची जागा मिळाली नाही तरी देशासाठी खेळणं सर्वात महत्त्वाचं असल्याचे त्याने सांगितले.

Devdutt Padikkal IND vs SL Test, Player Of The Series
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियाने १-० अशी दिमाखात जिंकली. या मालिकेत आपल्या बॅटचा सर्वाधिक जलवा दाखवणारा आणि सलग दोन शतके ठोकणारा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल ‘मालिकावीर’ ठरला आहे. या सामन्यानंतर पडिक्कलने एक मोठे आणि स्पष्ट विधान करत, देशासाठी आणि संघासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची आपली पूर्ण तयारी असल्याचे सांगितले आहे.

नंबर ३ वर दावेदार

श्रीलंकेविरुद्धच्या तीन डावांत पडिक्कलने १६७, ४४ आणि ११७ अशा धावा कुटून कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर आपली दावेदारी अत्यंत भक्कम केली आहे. विशेष म्हणजे, भारताचा या जागेवरील नियमित फलंदाज साई सुदर्शन दुखापतग्रस्त झाल्यामुळेच पडिक्कलला या मालिकेत अचानक संधी मिळाली होती.

पण आता मिळालेल्या या सुवर्णसंधीचे पडिक्कलने ज्या प्रकारे सोने केले आहे, ते पाहता नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेतही तोच आपली जागा कायम राखण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संघातून बाहेर असलेल्या साई सुदर्शनसाठी आता कमबॅक करणे अत्यंत कठीण झाले असून, त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra TimesWTC Points Table : अशी मालिका जिंकून काय फायदा? दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला मोठा फटका, आता फायनलमध्ये एन्ट्री कशी मिळणार?

“देशासाठी कुठेही खेळायला तयार”

सामन्यानंतरच्या बक्षीस वितरण समारंभात बोलताना पडिक्कलने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली. तो म्हणाला, “खरं सांगायचं तर, संघासाठी धावा काढण्यात मला सर्वाधिक आनंद मिळतो. मी कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतोय, याने मला काहीही फरक पडत नाही. तो तिसरा क्रमांक असो किंवा इतर कोणताही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या संघाचा विजय. जोवर मी त्या विजयात माझे योगदान देत आहे, तोवर मी पूर्णपणे समाधानी आहे.”

“अजून खूप काही शिकायचे बाकी”

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या युवा संघाबाबत आणि भविष्यातील आव्हानांबाबत बोलताना पडिक्कल म्हणाला, “आम्हाला अजून खूप मेहनत करायची आहे. तुम्ही पाहू शकता, हा आमचा अत्यंत युवा संघ आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यातून आपण काहीतरी नवीन शिकत राहणे महत्त्वाचे आहे. आमच्यापैकी प्रत्येकाला अजून खूप प्रगल्भ व्हायचे आहे आणि त्यासाठी सर्वच जण भुकेले आहेत. मला खात्री आहे की आम्ही अशीच सुधारणा करत राहू आणि आगामी काळात आणखी दमदार सामने खेळू.”

Maharashtra TimesShubman Gill : विजय हातातून निसटला, तरी गिल नाराज नाही; सामन्यानंतर कोणाला दिलं मालिका विजयाचं श्रेय?

कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला विजयाने मालिकेचा शेवट करता आला नाही, याची खंत असली तरी या मालिकेतून खूप काही मोठे धडे शिकायला मिळाल्याचे पडिक्कलने प्रांजळपणे कबूल केले. केएल राहुल आणि पडिक्कलने फलंदाजीत गाजवलेले वर्चस्व आणि कर्णधार गिलने गोलंदाजांचे केलेले कौतुक पाहता, टीम इंडियाची भविष्यातील वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचेच चित्र दिसत आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा