सावंतवाडी : धर्म वेगवेगळे असले तरी प्रत्येक धर्माची शिकवण प्रेम, बंधुभाव, शांतता आणि माणुसकीचीच आहे. मात्र, एकमेकांच्या धर्मातील चांगल्या शिकवणी समजून न घेता चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवल्याने समाजात धार्मिक तेढ निर्माण होताना दिसते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या धर्माचे आचरण अभिमानाने करावे; मात्र घराबाहेर पडल्यानंतर ‘आपण सर्वप्रथम भारतीय आहोत’ ही भावना मनात रुजविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले.
मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या वतीने पैगंबर मोहम्मद जयंतीनिमित्त सावंतवाडी शहरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ॲड. निंबाळकर बोलत होते.
निंबाळकर म्हणाले की, इस्लाम धर्म प्रेम, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देतो. हिंदू धर्मातील श्रावणबाळाची कथा आई-वडिलांच्या सेवेची शिकवण देते, तर बौद्ध धर्म करुणा आणि शांततेचा मार्ग दाखवतो. ख्रिश्चन धर्मासह सर्वच धर्मांचा मूलभूत उद्देश समाजात प्रेम, माणुसकी आणि सलोखा निर्माण करणे हा आहे. त्यामुळे धार्मिक मतभेदांना खतपाणी घालण्याऐवजी विविध धर्मांची सकारात्मक शिकवण समजून घेऊन परस्परांचा आदर करण्याची गरज आहे. धर्माची ओळख जपत भारतीयत्वाची व्यापक भावना अधिक बळकट झाली, तर समाजातील तणाव कमी होऊन एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रसाद गावडे यांनी कोकणातील पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा उपस्थित केला. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्याचे तसेच कोकणातील जमिनींची अनियंत्रित विक्री टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. कोकणचे निसर्गवैभव आणि संस्कृती टिकविण्यासाठी सर्व धर्मीयांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
माजी नगरसेवक ॲड. एजाज नाईक यांनी सर्वधर्मसमभावाचे महत्त्व स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध धर्मांचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगत त्यांनी या सामाजिक सलोख्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, देवा टेमकर, पुंडलिक दळवी, अमोल टेंबकर, भुवन नाईक, ॲड. ईजाज नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम, समीरा खलील, रमेश बोंद्रे, ॲड. ऋषिकेश पाटील, विजयालक्ष्मी चिंदक, महेश परूळेकर, नाजली नाईक, मुस्लिम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष रफिक मेमन यांच्यासह चांदमैनुद्दीन करोल, मोहम्मद अरिफ करोल, मोहम्मद शकील खान, जमिल अकबानी, शकील शेख, अनिस बिजली, बशीर पडवेकर, नईम मेमन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या बाल स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
