![]()
अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सरासरीच्या तुलनेत ३७ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी चिंतेत असून, अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, तर काहींची पेरणी अजूनही रखडली आहे. २० जुलैपर्यंतच्या अधिकृत शासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची एकूण सरासरी ३२४.७ मिमी अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ २०६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्याने सरासरीच्या केवळ ६३.५ टक्के टप्पा गाठला असून, ३६.५ टक्के पावसाची घट झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. येथे २५०.५ मिमी अपेक्षित असताना २१८.८ मिमी (८७.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात २३३.६ मिमीच्या तुलनेत १९७.२ मिमी (८४.४ टक्के) पाऊस झाला आहे. मोर्शी तालुक्यातही ३०१.१ मिमीच्या तुलनेत २५४.१ मिमी (८४.४ टक्के) पाऊस पडला आहे. इतर तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा कमी आहे. दर्यापूरमध्ये ७९.९ टक्के, धारणीत ७८ टक्के, नांदगाव खंडेश्वरमध्ये ७७ टक्के, वरुडमध्ये ६८ टक्के, तिवस्यात ६३.५ टक्के आणि चांदूर रेल्वेमध्ये ६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती तालुक्यात ५६.९ टक्के, तर धामणगाव रेल्वेमध्ये ५३.३ टक्के पाऊस झाला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातही केवळ ५३.७ टक्के पाऊस झाला आहे. पावसाच्या खंडामुळे अंकुरलेली पिके कोमेजली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. मात्र, हवामान अभ्यासक प्रा. अनिल बंड यांच्या मते, येत्या दोन दिवसांत हवामानात बदल होईल. २३ जुलैपर्यंत तुरळक पाऊस अपेक्षित असून, त्यानंतर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Source link
दहा दिवसांच्या खंडामुळे अमरावतीत पाऊस 37 टक्क्यांनी घटला:शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट
