![]()
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत अकोले तालुका एकल महिला समितीच्या वतीने ‘वाचनरंग ग्रंथालय’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एकल महिलांसह तालुक्यातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी आणि महिलांच्या विचारविश्वाला नवी दिशा मिळावी, या सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीतून हे मोफत ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. ‘वाचनरंग ग्रंथालय’चे उद्घाटन पारंपरिक पद्धतीऐवजी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत झाडाला पाणी घालून करण्यात आले. यावेळी डॉ. उमा कुलकर्णी, मॉडर्न हायस्कूलच्या प्राचार्या जयश्री ननावरे, अनिता बंगाळ, नगरसेविका प्रतिभा मनकर, शीतल वैद्य, नीता मुंदडा यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
उपस्थित एका एकल महिलेने सांगितले की, वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. पुस्तकांमुळे ज्ञान वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो, सकारात्मक विचार रुजतात आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. प्रत्येक महिलेने वाचनाची सवय जोपासली पाहिजे. ग्रंथालयात कथा, कादंबरी, चरित्र, सामाजिक विषय, प्रेरणादायी साहित्य, महिलांसाठी उपयुक्त पुस्तके अशा विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महिलांना नियमित वाचनाची सवय लागावी यासाठी दर महिन्याला वाचलेल्या पुस्तकांवर खुली चर्चा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. या चर्चासत्रांमुळे महिलांना केवळ पुस्तके वाचण्याची संधी मिळणार नाही, तर आपले विचार मांडण्याचे, अनुभव शेअर करण्याचे आणि एकमेकींशी संवाद साधण्याचे व्यासपीठही उपलब्ध होणार आहे. सूत्रसंचालन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले. विचारशील समाज निर्मितीस हातभार लागेल या उपक्रमाच्या नियोजनासाठी नाजेमा शेख, वर्षा बेळे, कीर्ती पांगरे, अर्चना भोर, कविता कामठे, छाया कोटकर, रेखा कोटकर, सीमा भागवत आणि वैशाली राजगुरू यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी वाचनातून मिळालेल्या अनुभवांचे कथन केले. एकल महिला समितीच्या या उपक्रमामुळे अकोले तालुक्यात महिलांमध्ये वाचनाची चळवळ निर्माण होऊन ज्ञानाधिष्ठित आणि विचारशील समाज निर्मितीस हातभार लागेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Source link
दर महिन्याला होणार चर्चासत्रे:एकल महिलांसाठी ‘वाचनरंग’चा ज्ञानदीप; अकोल्यात मोफत ग्रंथालयाचा शुभारंभ
