विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध : राज्यात सत्तारुढ-विरोधक आमने-सामने
वृत्तसंस्था
रांची
झारखंडमधील जेपीएससी तसेच जेएसएसीच्या भरती परीक्षांमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवारी पोलिसांकडून लाठीमार अन् अश्रूधूराचा मारा करण्यात आला होता. या घटनेच्या विरोधात भाजपने मंगळवारी पुकारलेल्या झारखंड बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बंदला जनतेचे पूर्ण समर्थन मिळाल्याचा दावा भाजपने केला आहे. तर काँग्रेस तसेच अन्य सत्तारुढ पक्षांनी बंद अयशस्वी ठरल्याचा दावा करत याला राजकीय ड्रामा ठरविले आहे.
रांची समवेत अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली आहेत. अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले. तर अभाविप कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ विधानसभेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर दुसरीकडे निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षांमधील भ्रष्टाचार प्रकरणी केवळ मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी चर्चा करणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. आमचे कुठल्याही राजकीय पक्षासोबत देणेघेणे नाही असे विद्यार्थ्यांचे सांगणे आहे.
विद्यार्थ्यांच्या निदर्शनांवरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विधानसभेत वक्तव्य केले. काही लोक या पूर्ण प्रकरणाचे राजकारण करू पाहत आहेत. जेपीएससीपासून सीजीएल पर्यंतच्या परीक्षांवरून सभागृहात वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. या परीक्षांबद्दल चौकशी करविण्यात येईल असे आश्वासन आम्ही विद्यार्थ्यांना दिले आहे. चौकशीवरून सरकारचा हेतू एकदम स्पष्ट असल्याचा दावा मुख्यमंत्री सोरेन यांनी केला आहे.
