Headlines

जगाला दिसला क्रिकेटमधला ‘गब्बर’, पण शिखर धवनचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहिलं, २०२६मध्ये नवी सुरुवात


क्रिकेटच्या मैदानावर ‘गब्बर’ म्हणून राज्य करणाऱ्या शिखर धवनच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले. त्याच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या घटनांनी त्याला कसं बदललं? जाणून घेऊयात.

Shikhar Dhawan Story
शिखर धवनची कहाणी
भारतीय क्रिकेटमधील ‘गब्बर’ शिखर धवनची कारकीर्द जितकी गाजली, तितकाच त्याचा वैयक्तिक प्रवासही चर्चेत राहिला. लग्न, घटस्फोट, मुलापासून दुरावा आणि क्रिकेटमधून निवृत्तीपर्यंतचे त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्प्यांबद्दल माहिती घेऊयात.

शिखरचे वादळी आयुष्य

शिखरचे वादळी आयुष्य

भारताचा लाडका ‘गब्बर’ म्हणजेच शिखर धवन याची ओळख मैदानावरचा एक धडाकेबाज सलामीवीर म्हणून राहिली. पण, त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा संघर्ष लपलेला होता. नुकत्याच २०२६ मध्ये झालेल्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे आणि कायदेशीर घडामोडींमुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. सुपरस्टार क्रिकेटर ते एकाकी बाप आणि आता आयुष्याची नवी सुरुवात… जाणून घेऊया शिखर धवनच्या आयुष्यातील हे ७ महत्त्वाचे टप्प्यांबद्दल.

क्रिकेटमधला ‘गब्बर’ आणि त्याचा उदय

क्रिकेटमधला 'गब्बर' आणि त्याचा उदय

शिखर धवनने २०१०मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहाली कसोटीत पदार्पण करताना त्याने अवघ्या ८५ चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. त्यानंतर तो भारताचा हुकमी सलामीवीर बनला. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने ३४ कसोटी, १६७ वनडे आणि ६८ टी-२० सामने खेळताना एकूण १०,८६७ धावा कुटल्या. मैदानावर मिशीला पीळ भरत सेलिब्रेशन करणारा हा ‘सुपरस्टार’ चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला.

आयशा मुखर्जीसोबतची ओळख आणि लग्न

आयशा मुखर्जीसोबतची ओळख आणि लग्न

शिखर आणि ऑस्ट्रेलियातील किकबॉक्सर आयशा मुखर्जी यांची पहिली ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. आयशाला तिच्या पहिल्या लग्नातून दोन मुली होत्या. शिखरने अतिशय खुल्या मनाने त्या दोन्ही मुलींचा स्वीकार केला. पुढे २०१४ मध्ये शिखर आणि आयशाला ‘झोरावर’ हा मुलगा झाला. हे चित्र एका आदर्श आणि परिपूर्ण कुटुंबाचे होते.

सुखी संसारात पडलेली दुराव्याची ठिणगी

सुखी संसारात पडलेली दुराव्याची ठिणगी

लग्नानंतर काही वर्षे सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने या नात्यात दुरावा येऊ लागला. मतभेद इतके वाढले की, अखेर सप्टेंबर २०२१ मध्ये हे दोघे अधिकृतपणे वेगळे झाले. इथून पुढे त्यांच्या घटस्फोटाची आणि कायदेशीर लढाईची अत्यंत प्रदीर्घ अशी प्रक्रिया सुरू झाली.

न्यायालयीन लढाई आणि घटस्फोटाचा निर्णय

न्यायालयीन लढाई आणि घटस्फोटाचा निर्णय

हा शिखरच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळ होता. त्याने दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली, ज्यामध्ये त्याने आयशाने त्याला मुलापासून दूर ठेवल्याचा आणि वैवाहिक आयुष्यात मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत त्याची वकिलांकडून बाजू मांडण्यात आली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने शिखरच्या बाजूने मांडलेल्या या आरोपांची दखल घेत त्याला घटस्फोट मंजूर केला.

एका बापाची वेदना जगासमोर मांडली

एका बापाची वेदना जगासमोर मांडली

या संपूर्ण प्रवासातला सर्वात भावनिक भाग म्हणजे शिखरचा मुलगा ‘झोरावर’. घटस्फोट देताना न्यायालयाने झोरावरच्या कायमस्वरूपी कस्टडीबाबत अंतिम निर्णय दिला नव्हता, मात्र भारत आणि ऑस्ट्रेलियात शिखरला मुलाला भेटण्याचे अधिकार देण्यात आले. २०२५ मध्ये शिखरने मुलापासून दूर राहण्याच्या वेदनेबद्दल सार्वजनिकपणे भाष्य केले होते. त्याने झोरावरसाठी लिहिलेला भावनिक संदेश पाहून एका बापाची तळमळ जगासमोर आली होती.

एका झंझावाती पर्वाला पूर्णविराम – क्रिकेटमधून निवृत्ती

एका झंझावाती पर्वाला पूर्णविराम - क्रिकेटमधून निवृत्ती

ज्या काळात वैयक्तिक आयुष्यात न्यायालयीन लढाया सुरू होत्या, त्याच काळात त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही थांबली होती. शिखरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध झाला. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२४ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती जाहीर केली. मैदानावर हजारो लोकांचा हिरो असलेला गब्बर, मैदानाबाहेर मात्र मुलाच्या विरहात एकाकी लढत होता, हा विरोधाभास चाहत्यांच्या मनालाही हेलावणारा होता.

२०२६ मध्ये आला मोठा ट्विस्ट आणि आयुष्याची नवी सुरुवात

२०२६ मध्ये आला मोठा ट्विस्ट आणि आयुष्याची नवी सुरुवात

२०२६ मध्ये शिखरच्या कथेला एक नवीन वळण मिळाले. फेब्रुवारी २०२६ मध्ये दिल्लीतील न्यायालयाने ऑस्ट्रेलियन प्रॉपर्टी सेटलमेंटशी संबंधित एका प्रकरणात आयशाला ५.७ कोटी रुपये शिखरला परत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काही दिवसांनी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी शिखरने सोफी शाइनसोबत विवाहबंधनात अडकत आयुष्याची नवी सुरुवात केली. याच काळात आयशाबद्दल शिखरच्या नावाने काही बनावट कोट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, पण शिखरने ते खोटे असल्याचे स्पष्ट करत अफवांना पूर्णविराम दिला आणि आपण आता आयुष्यात पुढे गेल्याचे सांगितले.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा