Headlines

चोपड्याजवळील पार उमर्टी गावात पहाटे छापा:दाेघांना अटक, 400 पोलिसांच्या फौजेचे ‘कोम्बिंग’, 2 कट्टे, 4 काडतुसे, 32 गाड्या जप्त




चोपड्याजवळील पार उमर्टी (मध्यप्रदेश) गावात 400 पोलिसांच्या फौजफाट्याने मंगळवारी पहाटे 4 वाजेपासून चार तास ऑपरेशन कोम्बिंग सर्च राबवत बेकायदेशीर शस्त्र निर्मिती व तस्करीविरोधात धडक कारवाई केली. यात 2 देशी कट्टे, 4 जिवंत काडतुसे, शस्त्र निर्मितीचा कच्चा माल, 32 निनावी व महाराष्ट्र पासिंगच्या मोटारसायकली जप्त केल्या. पार उमर्टीतून (ता. वरला, जि. बडवानी) दोन संशयितांना अटक केली असून 45 घरांची झडती घेण्यात आली. 20 संशयितांची चौकशी तर 27 आरोपींच्या घरांचे जिओ- टॅगिंग करण्यात आले आहे. जळगाव पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली जळगाव, नाशिक, धुळे आणि बडवानी पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यात संपतसिंग प्यारसिंग भाटिया आणि राजेंद्रसिंग बडवानीसिंग टकराणा (दोघेही रा. पार उमर्टी) यांना ताब्यात घेत चोपडा ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित व पसार संशयितांचा शोध घेणे, अवैध शस्त्रास्त्र निर्मिती व तस्करीवर आळा घालण्यासह पवारवाडी पोलिस ठाण्यात (नाशिक) दाखल शस्त्रास्त्र प्रकरणांतील आरोपींच्या शोधासाठी मोहीम राबवली. संशयितांच्या अंगझडतीत दोन देशी कट्टे, चार काडतुसे जप्त केली. देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, लोखंडी साचे, करवती, टेस्टर, रॉड, धातू तापवण्याचे उपकरण, हातोडे आदी ताब्यात घेतले. अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जळगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले, चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, चोपडा शहराचे पोलिस निरीक्षक पवन देसले, ग्रामीणचे निरीक्षक संजय सोनवणे आदींच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबवण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यातील 8 पोलिस निरीक्षक, 35 दुय्यम अधिकारी व 240 अंमलदार, नाशिक जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व 70 अंमलदार, धुळ्यातील अधिकारी व 70 अंमलदार असा एकूण 400 हून अधिक पोलिस ताफा व 20 शासकीय वाहने कारवाईत सहभागी झाले होते. नवी चाल; दुर्गम जंगलातून रॅकेट सुरूच मंगळवारी पोलिसांच्या हाती फारसे काहीच लागले नाही. गेल्या दोन वर्षांत पुणे -मुंबईसारख्या शहरांत बेकायदेशीर गावठी कट्ट्यांवर झालेल्या कारवायातून उमर्टीचे नाव प्रकाशात आले. त्यानंतर बाहेरील विशेष पथकांनीही येथे छापे टाकले. परिणामी, स्थानिक गुन्हेगारी साखळीवर दबाव वाढला. यापासून बचावासाठी गुन्हेगारांनी रणनीती बदलली. उमर्टी सोडून त्यांनी मध्य प्रदेशातील दुर्गम जंगलाकडे मोर्चा वळवला. तेथूनच अवैध शस्त्रास्त्रांचे रॅकेट चालवले जात आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत