कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
त. भा. वार्ताहर
एकसंबा : जुलै महिन्यात प्रारंभी दहा दिवस पडलेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाला होता. पण मध्यंतरी पावसाने पुन्हा ओढ दिल्याने खरिपावर विपरीत परिणाम जाणवत होता. पण गेल्या तीन-चार दिवसापासून वातावरणात बदल होऊन पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे सीमाभागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून चिकोडी व निपाणी तालुक्यातील कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे कृष्णा व दूधगंगा नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. परिणामी कल्लोळ कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत जवळपास 4 फुटाहून अधिक वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने नद्या ओसंडून वाहत आहेत. वातावरणातील बदलामुळे शेती पिकांना मात्र पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून 48 हजार 250 क्युसेक, दूधगंगा नदीतून 11 हजार 616 क्युसेक असा एकूण कल्लोळ कृष्णा नदी पात्रात 59 हजार 866 क्युसेकने पाण्याचा प्रवाहात येत होता. 24 तासांत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 11 हजार 885 क्युसेकने वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या पाणी पातळीमुळे चिकोडी व निपाणी तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये कल्लोळ-येडूर, भोज-कारदगा, भोजवाडी-कुन्नूर, सिदनाळ-अकोळ, हुन्नरगी-ममदापूर केएल, बारवाड-कुन्नूर बंधारे वाहतुकीस बंद झाले आहेत.
नद्यांच्या पाणी पातळीत जरी वाढ झाली असली तरी तालुक्यात मात्र पावसाचा जोर नसल्याने शेतकरी आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी पडलेला संततधार पाऊस वगळता दोन आठवडे झाले तरी पावसाची साथ मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. गेल्या 4 दिवसांपासून वातावरणात जरी गारवा निर्माण झाला असला तरी म्हणावा तसा जोरदार पाऊस झाला नाही. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे मात्र पुन्हा एकदा नद्या प्रवाहित झाल्या आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 67 मि. मी., वारणा 32 67 मि. मी., राधानगरी 107 67 मि. मी., काळम्मावाडी 53 67 मि. मी., पाटगाव 73 67 मि. मी., महाबळेश्वर 78 67 मि. मी., नवजा 85 67 मि. मी., पावसाची नोंद झाली आहे.
कारदगा,बारवाड व खडकोळ धरण दुसऱ्यांदा पाण्याखाली
कारदगा : कारदगा, बारवाड, मांगूर, कुन्नूर, भोज, भोजवाडीसह परिसरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन कारदगा, बारवाड व खडकोळ धरण दुस्रयांदा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक पुन्हा बंद झाली आहे.
गतवर्षी मे, जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने जून अखेर तीनवेळा पूर येऊन गेला होता. मात्र चालूवर्षी जुलै सुरू होताच प्रथम पावसाने दमदार हजेरी लावली आणि गेले चार दिवस अक्षरश: झोडपून काढले. गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दूधगंगा व वेदगंगा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणी पात्राबाहेर पडले आहे. या परिसरात महत्वाचे समजले जाणारे कारदगा येथील दूधगंगा नदीवरील तसेच बारवाड येथील दूधगंगा नदीवरील व भोजवाडी शिवापूरवाडी दरम्यान वेदगंगा नदीवरील धरण वजा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
