Headlines

गौडगाव भक्तिमय; हनुमान दर्शनासाठी भाविकांची रांग:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; अन्नछत्र मंडळाकडून उत्तम नियोजन‎



अक्कलकोट स्टेशन | गौडगाव (ता. अक्कलकोट) येथील हेमाडपंथी श्री जागृत मारुती मंदिरात श्रावणी शनिवारनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासूनच मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्रासह परराज्यांतून आलेल्या

.

भाविकांनी श्रद्धेने मारुतीरायाचे दर्शन घेत पूजा केली. ‘जय हनुमान’, ‘श्री मारुतीराया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्री जागृत मारुती अन्नछत्र मंडळाच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी अन्नछत्रातील महाप्रसादाचा लाभ घेतला. तुळजापूर येथील जागृत हनुमानाचे भक्त सचिन बनसोडे यांच्या वतीनेही श्रावणमासनिमित्त भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

गौडगावचे श्री जागृत मारुती मंदिर हे प्राचीन आणि श्रद्धेचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. श्रावणी शनिवारनिमित्त सोलापूर येथील शिवशंभो रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील तरुणांसह भाविकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणताही भेदभाव न करता भरपेट महाप्रसाद देण्याची परंपरा अन्नछत्र मंडळाने जपली आहे. पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि दर्शनातील शिस्त यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि सेवेकऱ्यांनी दिवसभर नियोजन केले. त्यामुळे गर्दी असूनही भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळाल्या. श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाने भारलेल्या वातावरणामुळे गौडगाव परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. श्री जागृत मारुती मंदिरावरील भाविकांची श्रद्धा आणि अन्नछत्र मंडळाची सेवाभावी परंपरा यामुळे दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याचे चित्र श्रावणी शनिवारच्या गर्दीतून दिसून आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत