सावंतवाडी : शहरातील गेल्या शंभर वर्षांपासून रुग्णसेवा देणारा महावीर दवाखान्याचे डॉक्टर निवृत्त होत असल्याने तो बंद होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांसाठी ही बाब चिंताजनक असल्याचे सांगत नगरपरिषदेने पुढाकार घेऊन कायमस्वरूपी रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेचा अर्थसंकल्प शिलकीचा असल्याने शहरातील गरीब नागरिकांसाठी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करून मोफत जेनेरिक औषधांची सुविधा उपलब्ध करून देणे नगरपरिषदेला शक्य आहे,.असे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
महागाई वाढत असताना औषधांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना मोफत जेनेरिक औषधे आणि प्राथमिक उपचार मिळाल्यास सावंतवाडीसह परिसरातील अनेक गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
किमान 10 खाटांचे रुग्णालय उभारण्याची मागणी
महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका आणि नगरपरिषदांकडून छोटी रुग्णालये चालविली जात आहेत. त्याच धर्तीवर सावंतवाडी नगरपरिषदेने किमान10 खाटांचे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी परुळेकर यांनी केली आहे. सर्दी, ताप, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या दैनंदिन आजारांवर प्राथमिक उपचार स्थानिक पातळीवर उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात शहरात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होऊ शकते; मात्र तो पर्यंत सर्वसामान्यांसाठी नगरपरिषदेचे रुग्णालय महत्त्वाची आरोग्यसेवा देऊ शकते. त्यामुळे महावीर दवाखाना बंद करण्याऐवजी त्याचे सक्षम आरोग्य केंद्रात रूपांतर करण्याचा विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून सावंतवाडीतील गरीब व गरजू नागरिकांसाठी कायमस्वरूपी आरोग्यसेवेची व्यवस्था उभारावी, असे आवाहन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.
