Headlines

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम पुन्हा लांबणीवर, सात वर्षांपासून पुणेकर वाहतूककोंडीत; २०२७पर्यंत प्रतीक्षा| Maharashtra Times


म.टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पुणे महापालिकेने दिलेली जूनअखेरची मुदत पुन्हा हुकली असून, आता हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे. सात वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, धूळ आणि खड्ड्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दोन दिवसांपूर्वी या रस्त्यासाठीची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये कात्रज ते खडी मशिन चौकादरम्यानचा रस्ता मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यासाठीच्या भूसंपादनाचा तिढा तोपर्यंत सुटेल, असे अपेक्षित असून, त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम यापूर्वी जूनअखेर काम पूर्ण होईल, असे प्रशासनाने म्हटले होते. मात्र, काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

Maharashtra TimesPune News: पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘एसआरए’ देणार ५१ हजार घरे, तीन वर्षांत १८० योजना पूर्ण होणार

८४ऐवजी ५० मीटर रुंद

कात्रज ते खडी मशिन चौक या सुमारे साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रकल्प सन २०१७मध्ये सुरू झाला. सुरुवातीला ८४ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित होता. मात्र, भूसंपादनातील अडचणी, नियोजनातील बदल आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे प्रकल्प रखडला. अखेर पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या कामासाठी आवश्यक असलेल्या १०९ मिळकतींपैकी ८४ मिळकती ताब्यात आल्या असून, उर्वरित २५ मिळकतींचे भूसंपादन अद्याप सुरू आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

कोंडीचा प्रश्न कायम

कात्रज-कोंढवा रस्त्यावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. अपूर्ण रस्ता, अरुंद मार्ग, खड्डे आणि धुळीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रोख मोबदल्यामुळे बदलले धोरण

सुरुवातीला ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’च्या माध्यमातून भूसंपादन करण्याचे नियोजन होते. मात्र, अनेक जागामालकांनी रोख मोबदल्याची मागणी केल्याने महापालिकेला धोरणात बदल करावा लागला. जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर एप्रिलपासून रोख मोबदल्याद्वारे भूसंपादनाला गती देण्यात आली आहे. या प्रक्रियेत सुमारे ४४ हजार चौरस मीटर जागा महापालिकेच्या ताब्यात येणार आहे. भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Maharashtra TimesPune News: पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?

कात्रज-कोंढवा रस्त्याचं काम

लांबी- सुमारे ३.५ कि.मी. (कात्रज ते खडीमशिन चौक)
प्रकल्पाची सुरुवात- २०१७
मूळ प्रस्तावित रुंदी- ८४ मीटर
सध्या मंजूर रुंदी- ५० मीटर
एकूण मिळकती- १०९
ताब्यात आलेल्या मिळकती- ८४
प्रलंबित मिळकती- २५
नवीन डेडलाइन- मार्च २०२७

पुणे शहरात मेट्रो मार्गिका ३, रिंग रोड, उच्च क्षमता वर्तुळाकार मार्गासह अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. पण अनेक कारणांमुळे काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणते प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत