MSRTC Fare Hike: उन्हाळी हंगामान लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ १५ जुलैनंतर संपणार होती. पण डिझेलच्या वाढत्या दरांमुळे एसटीने काही दिवस ही भाडेवाढ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य परिवहन प्राधिकरणाची बुधवारी होणारी पूर्वनियोजित बैठक रद्द झाल्याने राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) प्रस्तावित भाडेवाढ तूर्त टळली आहे. दरम्यान, महामंडळाने हंगामी अर्थात उन्हाळी भाडेवाढीला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता ३१ जुलैपर्यंत १० टक्के भाडेवाढ लागू राहणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक आता शुक्रवारी होणार असून त्यात प्रस्तावित भाडेवाढीवर निर्णय अपेक्षित आहे.
पुन्हा भाडेवाढीचा प्रस्ताव
डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असे एसटी महामंडळाने बुधवारी जाहीर केले आहे. राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीसाठी १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्याला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. हंगामी भाडेवाढ एक रुपयांच्या पटीत असल्याने सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात सातत्याने वाद होत आहेत. याबद्दल वाहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसटी कामगार संघटनांनीही यावर आक्षेप नोंदवत पाच रुपयांच्या पटीत तिकीट दर ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांनी बुधवारी १३.५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव मांडला आहे. यापूर्वीच प्रवशांकडून १० टक्के भाडेवाढीसाठी आक्षेप नोंदला जात असताना जर १३.५ टक्के भाडेवाढ मंजूर झाली असती तर सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे असा संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यात कोल्हापूर, नाशिक, नांदेड आणि सोलापूरसह ३१ विभागांपैकी एकूण २१ विभाग तोट्यात चालत आहे. एसटी महामंडळासमोर अनेक आर्थिक अडचणी असल्यामुळे ही मुदतवाढ कायम राहणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. एसटी महामंडळाचा सर्वाधिक खर्च इंधनासाठी होतो. त्यामुळे इंधन वापर कमी करण्यासाठी राज्यव्यापी डिझेल-बचत मोहीम त्यांनी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत, डेपोंना इंधन-बचतीचं लक्ष्य देण्यात आलं आहे. सध्या सर्व ३१ विभांगांमध्ये दिवसाला तब्बल १०.८७ लाख लिटर डिझेलचा वापर केला जातो.
कसे आहेत तिकीट दर?
या करणांमुळे महामंडळ तोट्यात आहे. महसूल सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत तात्पुरती भाडेवाढ लागू करण्यात आली होती. या भाडेवाढीनुसार सामान्य किंवा मिडी बसचं भाडं ११.०५ (१२)रुपये असेल. प्रौढ प्रवाशांसाठी किमान भाडं १४ रुपये तर किशोरवयीन मुलांकडून ७ रुपये भाडं आकारलं जात आहे.
महाराष्ट्रातील एसटी महामंडळ देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बस वाहतूक जाळ्यांपैकी एक आहे. त्यांच्या ताफ्यात १४,००० हून अधिक बस आहेत. राज्यातील प्रमुख शहरांपासून ते दुर्गम ग्रामीण भागांपर्यंत एसटीचं जाळं पसरलेलं आहे. दररोज ५५ लाखांहून अधिक प्रवासी एसटी प्रवास करतात. त्यामुळे या भाडेवाढीचा या सर्व प्रवाशांना फटका बसणार आहे.
महामंडळाचा हा निर्णय योग्य आहे का? महसूल वाढवण्यासाठी याशिवाय कोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात? तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला सांगा.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा