मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेसाठी 58 महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुबेदार प्रदीप पाटील (महाराष्ट्र) तसेच सुबेदार महेंद्रसिंग (उत्तराखंड) यांनी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पाडली. भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमता, धावणे, उंची, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, नेतृत्वगुण तसेच विविध आवश्यक निकषांच्या आधारे निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते यांच्या हस्ते आर्मी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रा. के. के. राबते यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात एनसीसीचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान, शिस्त, नेतृत्वगुण, राष्ट्रीय एकात्मता आणि देशसेवेची भावना विकसित करण्यात एनसीसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. महाविद्यालयात एनसीसीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भरती प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध शारीरिक चाचण्या, धावणे, प्राथमिक फिटनेस चाचणी, शिस्त व नेतृत्वगुणांचे मूल्यमापन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व चाचण्या भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडल्या.
यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका अन्वेषक कदम मॅडम उपस्थित होत्या. तसेच एनसीसीचे वरिष्ठ कॅडेट्स यांनी भरती प्रक्रियेसाठी नियोजन, शिस्त व व्यवस्थापनामध्ये मोलाचे सहकार्य केले.
या निवड प्रक्रियेमधून एकूण 18 विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य प्रा. के. के. राबते, प्राध्यापकवृंद तसेच एनसीसी विभागाने अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून शिस्त, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास, साहसी उपक्रम, सामाजिक बांधिलकी, सैन्यदलातील करिअरच्या संधी तसेच राष्ट्रसेवेची प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
महाविद्यालयातील एनसीसी विभागामार्फत दरवर्षी अशा दर्जेदार उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक उत्तरदायित्व, नेतृत्वगुण आणि शिस्त यांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांनी सांगितले.
