Headlines

अंतराळात रडूनही अश्रू गालावर का पडत नाहीत? शुभांशू शुक्ला, क्रिस हॅडफिल्ड यांनी सांगितले त्यामागचे ‘सायन्स’ । Maharashtra Times


पृथ्वीवर आपण भावनिक झाल्यास डोळ्यातून अश्रू गालावरून खाली वाहतात, परंतु अंतराळात तसे होत नाही. झिरो ग्रॅव्हिटीमध्ये डोळ्यात आलेले पाणी वाहण्याऐवजी तिथेच साठून राहिले तर काय होते, याचे रंजक गुपित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी अलिकडेच राज शमानींच्या पॉडकास्टमध्ये तर जागतिक ख्यातीचे अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड यांनी थेट प्रात्यक्षिकच करून दाखवले आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Crying in Space । Maharashtra Times
सौजन्य: यूट्यूब, ‘फिगरिंग आऊट’ पॉडकास्ट, इन्स्टाग्राम
अंतराळात डोळ्यातून आलेले आश्रू गालावर का येत नाही? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहिती आहे का? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातून भारताला पाहताना आलेल्या अश्रूंचा एक भावनिक अनुभव शेअर केला. तर कमांडर क्रिस हॅडफिल्ड यांनी प्रत्यक्ष स्पेस स्टेशनमध्ये रडण्याचा लाईव्ह डेमो दिला होता. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे मानवी शरीरातील द्रवांवर कसा परिणाम होतो आणि अश्रू गालावर न पडता डोळ्याभोवती पाण्याचा फुगा कसा बनवतात, याचे रंजक सायन्स त्यांनी स्पष्ट केले आहे.

पृथ्वीवर डोळे पाणावले की अश्रू गालावरून खाली घळघळतात. पण हीच क्रिया जर अंतराळात घडली तर नक्की काय होईल? गगनयान मोहिमेचे भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि कॅनेडियन अंतराळवीर क्रिस हॅडफिल्ड या दोघांनीही या प्रश्नाचे अत्यंत रंजक आणि शास्त्रोक्त उत्तर दिले आहे.

गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अंतराळात रडणे पृथ्वीसारखे सोपे नसते; तिथे भावना व्यक्त करताना भौतिकशास्त्राचे नियम पूर्णपणे बदलतात.

शुभांशू शुक्ला यांचा भावनिक प्रसंग

अलिकडेच राज शमानीच्या ‘फिगरिंग आऊट’ पॉडकास्टमध्ये शुभांशू शुक्ला यांनी अंतराळातील त्यांच्या ट्रेनिंग आणि अनुभवांबद्दल संवाद साधला. ते म्हणालेत, ‘जेव्हा तुम्ही अंतराळातून किंवा स्पेस स्टेशनवरून पहिल्यांदा भारताला पाहता, तेव्हा तो सार्थ अभिमानाचा क्षण असतो. तो अदभूत नजारा पाहून मी भावनिक झालो आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. पण झिरो ग्रॅव्हिटीमुळे (Zero Gravity) ते अश्रू गालावरून खाली आलेच नाहीत.’

क्रिस हॅडफिल्ड यांचा लाईव्ह डेमो

याच विषयावर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर (ISS) असताना कॅनेडियन अंतराळवीर कमांडर क्रिस हॅडफिल्ड यांनी प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवला होता. त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये डोळ्यात मुद्दाम पाणी सोडले. गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ते पाणी खाली वाहण्याऐवजी डोळ्याच्या खाली एका पाण्याचे गोल (Water Blob) बनून तरंगू लागले. त्यांनी सांगितले की, जर तुम्ही अंतराळात जास्त वेळ रडलात, तर हे अश्रू वाढत जातात आणि डोळ्याभोवती पाण्याचा एक मोठा फुगा तयार होतो. तो फुगा स्वतःहून फुटत नाही किंवा खाली पडत नाही, तो हाताने पुसावा लागतो.

अश्रू न वाहण्यामागचे ‘सायन्स’ काय?

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे कोणतीही द्रव गोष्ट वजनानुसार खालच्या दिशेने खेचली जाते. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ‘सरफेस टेन्शन’ म्हणजेच पृष्ठभागाचा ताण काम करतो. यामुळे पाण्याचे थेंब किंवा अश्रू हे त्वचेला चिकटून राहतात.

अश्रू डोळ्यातच अडकतात

डोळ्यातून बाहेर आलेले पाणी गालावर घसरण्याऐवजी डोळ्याभोवतीच साठून राहते. अश्रू हे खारट पाण्याचे असतात. जर ते डोळ्यातून बाहेर पडून वाहिले नाहीत, तर ते डोळ्यातच साठून राहिल्यामुळे डोळ्यांची तीव्र जळजळ होऊ शकते. अंतराळवीरांना स्पेसमध्ये डोळे पुसण्यासाठी नेहमी विशेष मायक्रोफायबर रुमाल सोबतीला ठेवावा लागतो.

(Disclaimer: प्रस्तुत वृत्त केवळ उपलब्ध माहिती, सर्वसामान्य संदर्भांच्या आणि इन्स्टाग्रामवरील विविध डिजिटल रील्स व व्हिडिओंवरून घेतलेल्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या वृत्तातील माहितीची अचूकता, पूर्णता किंवा विश्वासार्हतेबाबत ‘मटा’ (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन) कोणताही दावा करत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही.)

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा