Headlines

Zimbabwe Boat Accident: पाण्यात बॉडी तरंगत होत्या! बोट उलटून 44 जणांचा शेवट; बचावलेल्या प्रवाशानं सांगितली आँखोदेखी


Zimbabwe Boat Accident: ९५ जणांना घेऊन जाणारी बोट तलावात उलटली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीला अपघात झाला. या अपघातात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.

boat accident in lake
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हरारे: बोट उलटून झालेल्या दुर्दैवी अपघातामधील मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेली बोट उलटली. अपघातावेळी बोटीत ९५ जण होते. यातील ९० प्रवासी होते, तर ५ कर्मचारी होते. झिम्बाब्वेच्या एका तलावात ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीबामधील तलावात ही दुर्घटना घडली. त्यावेळी बोटीत ९५ जण होते. झिम्बाब्वेच्या उत्तरेला असलेलं करीबा शहर आणि आसपासच्या अनेक बेटांवर मासेमारी चालते. अपघातग्रस्त बोट मच्छिमारांना घेऊन ये-जा करणारी होती. सोसाट्याचा वाऱ्यामुळे बोट उलटली. करीबा तलाव झिम्बाव्बे आणि झाम्बियाच्या सीमेवर आहे. राजधानी हरारेपासून हा तलाव ३०० किलोमीटर दूर ईशान्येला आहे. या दुर्दैवी अपघातानंतर राष्ट्रपती एमरसन मनांगाग्वा यांनी आणीबाणीची घोषणा केली.

स्थानिक खासदार मुत्सा मुरोम्बेदजी यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘ही तीच नाव आहे, प्रवास सुरू होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ आहे. स्थानिक नागरिक करीबा शहर गाठण्यासाठी तलाव ओलांडतात. त्यासाठी या बोटीचा वापर करतात. हा प्रवास ५ तासांचा असतो. त्या बोटीत नेमके किती जण होते, याचं प्रामाणिक उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायला हवं,’ असं खासदार मुत्सा मुरोम्बेदजी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं.

प्रत्यक्षदर्शीनं AFP वृत्तसंस्थेला अपघातावेळची भीषण परिस्थिती सांगितली. ‘हवामान खराब असतानाही सकाळी रवाना झाली. मोठ्या लाटेची धडक बसल्यानं बोटीचं इंजिन बंद पडल्याची शक्यता आहे.’ मॅक्सटन कान्हेमा या अपघातातून कसेबसे वाचले. ‘बोट बुडाल्यानंतर आम्ही बराच वेळ पाण्यात होतो. तेव्हा काही बोटी मदतीला आल्या. बचाव कार्यासाठी मटुसाडो राष्ट्रीय उद्यानानं एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिलं. स्थानिकांच्या आणि सैन्याच्या मोठ्या बोटीदेखील बचाव कार्यात उतरल्या होत्या,’ अशी आँखोदेखी कान्हेमा यांनी कथन केली.

‘लोक संकटात होते. अनेक शव पाण्यावर तरंगत होते. ते दृश्य काळीज पिळवटून टाकणारं होतं. ज्यांना वाचवणं शक्य होतं, त्यांना वाचवलं गेलं. हवामान खराब असल्यानं मदत उशिरा पोहोचली. बचाव कार्य सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे दुर्दैवानं अनेकांचे जीव गेले. जवळपास ६० जणांना वाचवण्यात आलं,’ असं कान्हेमा यांनी सांगितलं.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा