IND vs SL, WTC Points Table : श्रीलंकेविरुद्ध विजय मिळाला असता तर भारत थेट चौथ्या स्थानावर पोहोचला असता. मात्र, सोनल दिनुशाच्या झुंजार फलंदाजीमुळे सामना ड्रॉ झाला. आता भारतासमोर उरलेले ७ कसोटी सामने निर्णायक ठरणार आहेत. WTC पॉइंट्स टेबलमध्ये कोणाला फायदा झाला? जाणून घ्या…
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी अनिर्णित राहिल्याने टीम इंडियाला एका दणदणीत विजयावर पाणी सोडावे लागले आहे. श्रीलंकेच्या सोनल दिनुशाने एकट्याच्या जीवावर सामना वाचवला आणि याच एका ड्रॉमुळे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशांना मोठा सुरुंग लागला आहे. भारताने ही मालिका १-० ने जिंकली असली, तरी या एका ड्रॉमुळे भारताचे गुणतालिकेतील गणित पार बिघडले आहे, तर दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट संघाला मात्र याचा मोठा फायदा झाला आहे.
टीम इंडियाचं गणित नेमकं कसं बिघडलं?
कोलंबो कसोटी जिंकली असती, तर भारतीय संघ जवळपास ५७ टक्के विजयाच्या टक्केवारीसह थेट चौथ्या स्थानावर पोहोचला असता. मात्र, आता हा सामना अनिर्णित राहिल्याने भारताला ५१.५२ टक्क्यांसह पाचव्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. यामुळे आता टीम इंडियासाठी डब्ल्यूटीसी फायनलचा रस्ता अत्यंत खडतर झाला आहे. भारताला आता न्यूझीलंडविरुद्ध २ आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत ५ असे एकूण ७ कसोटी सामने खेळायचे आहेत. सलग ७ सामने जिंकणे हे अत्यंत मोठे आव्हान असून, आता हे सर्व सामने भारतासाठी करो या मरो असणार आहेत.
भारताच्या या नुकसानीचा सर्वाधिक फायदा बांगलादेशला झाला आहे. बांगलादेशचा संघ ५५.५६ टक्क्यांसह गुणतालिकेत अद्याप चौथ्या स्थानावर खंबीरपणे उभा आहे. दुसरीकडे, सामना वाचवूनही श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानावरच राहिला आहे दरम्यान, तो हारला असता तर सातव्या स्थानी गेला असता. मात्र, या मालिकेतील खराब कामगिरीमुळे श्रीलंकेच्या फायनल खेळण्याच्या आशा आता पूर्णपणे संपुष्टात आल्या आहेत.
गुणतालिकेतील अव्वल संघांवर नजर टाकल्यास, सध्या ऑस्ट्रेलियन संघ तब्बल ८० टक्क्यांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे आणि त्यांची फायनलची दावेदारी सर्वात भक्कम मानली जात आहे. तर, दक्षिण आफ्रिका ७५ टक्क्यांसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड ७२.२२ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही संघ याआधीचे आयसीसी डब्ल्यूटीसी चॅम्पियन्स आहेत. त्यामुळे, यावेळीही यांच्यापैकीच दोन संघांनी फायनल खेळल्यास क्रिकेट विश्वाला नवा चॅम्पियन मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. बांगलादेश सध्या टॉप-४ मध्ये असला तरी त्यांचा पुढचा प्रवास अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा