माळशिरस -“ज्ञानोबा-तुकाराम… माऊली… माऊली…” अशा आकाशाला गवसणी घालणाऱ्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या अखंड निनादाने, डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताकांनी, हरिनामाच्या गजराने आणि माऊलीच्या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी झालेल्या भक्तांच्या उत्स्फूर्त झुंबडीने माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा (पानीव पाटी) परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सकाळी अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. लाखो वारकरी आणि भाविकांनी हा नेत्रदीपक रिंगण सोहळा तसेच त्यानंतर रंगलेले पारंपरिक खेळ आपल्या नयनात आणि मनात कायमचे साठवून ठेवले.
माळशिरस येथील मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी वेळापूरच्या दिशेने प्रस्थान करताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. सर्वात पुढे भगव्या पताका खांद्यावर घेतलेले पताकाधारी वारकरी, त्यांच्या मागोमाग टाळकरी, वीणेकरी, तुळशीधारक, हंडे वाहणाऱ्या महिला आणि शिस्तबद्ध दिंड्या “पायी हळूहळू चला, मुखी विठ्ठल बोला” म्हणत विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून पुढे सरकत होत्या. अभंग, हरिपाठ आणि विठ्ठलनामाच्या गजरात वारीचा प्रत्येक क्षण भक्तिमय झाला होता.
रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच वारकरी आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी ८.१० वाजता माऊलींच्या अश्वाचे आगमन होताच अश्वाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये एकच उत्साह संचारला. त्यानंतर सकाळी ८.५० वाजता माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. पालखीने दिंड्यांसह संपूर्ण मैदानाला प्रदक्षिणा घालत मध्यभागी स्थान घेतले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि मान्यवरांनी पालखीचे भक्तिभावाने स्वागत केले.
सकाळी ९.४५ वाजता मुख्य गोल रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. चोपदारांनी विधीपूर्वक अश्वाला रिंगण दाखविल्यानंतर सर्वांच्या नजरा माऊलीच्या अश्वाकडे खिळल्या. काही क्षणांतच माऊलीच्या अश्वाने भरधाव वेगाने मैदानाला सलग पाच दिमाखदार फेऱ्या पूर्ण केल्या. प्रत्येक फेरीबरोबर “ज्ञानोबा-तुकाराम”, “माऊली… माऊली…” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा अधिकच रंगत गेला.
अश्वाच्या प्रत्येक फेरीनंतर त्याच्या पायाखालची पवित्र माती मस्तकी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी अश्वाचे दर्शन घेत भावविभोर होत नम्रतेने माती मस्तकी लावली. श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला. अश्वाने पाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर तो पालखीजवळ येताच भाविकांनी जल्लोषात जयघोष केला आणि संपूर्ण मैदान भक्तिमय वातावरणाने भारावून गेले.
बरिंगण सोहळ्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे फुगड्या, पावल्या, हमामा, हुतूतू, काटवट यांसारखे पारंपरिक खेळ रंगले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिला आणि पुरुष वारकरी देहभान, वय आणि थकवा विसरून या खेळांमध्ये सहभागी झाले. “माऊली… माऊली…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड नामघोषात भक्ती आणि आनंदाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला.
रिंगण सोहळ्यासाठी पोलीस, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम तसेच इतर शासकीय विभागांनी चोख नियोजन केले होते. वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती. खुडूस ग्रामपंचायत, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध सेवाभावी संस्थांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, पिण्याचे पाणी आणि भोजनाची व्यवस्था करून सेवाभावाचा आदर्श घालून दिला.
दिंड्यांचा हा महासागर, भगव्या पताकांचे डौलदार दृश्य, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड घोष आणि माऊलीच्या अश्वाच्या पाच दिमाखदार फेऱ्यांनी सजलेला खुडूस फाटा (पानीव पाटी) येथील दुसरा गोल रिंगण सोहळा यंदाच्या वारीतील अविस्मरणीय अध्याय ठरला. हा अलौकिक सोहळा डोळ्यांत साठवत आणि सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ मनात बाळगत लाखो वारकरी पुढील मुक्कामासाठी वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
