‘ईश्वर कोणत्याही मनुष्याला पोटाशिवाय कधीच जन्माला घालणार नाही. त्यामुळे वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचा व्यवसाय तुम्ही पुढे न्या’, असं आईचं मनापासूनचं सांगणं होतं, तर ‘महतकष्ट असलेल्या या क्षेत्रात आम्ही येऊच नये’, असं वडिलांचं ठाम मत. विभिन्न टोकांच्या या दोन विचारांच्या मध्ये आमची जडणघडण होत होती आणि माझी पावलं कळत नकळत हॉटेल व्यावसायाच्या दिशेनंच पडत होती.
आम्ही हॉटेल क्षेत्रात येऊ नये, असं वडिलांना वाटण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यावेळी या व्यवसायाला प्रतिष्ठाच नव्हती. तेव्हा लोक आम्हाला आचारी म्हणायचे. शिवाय, या धंद्यात असलेल्यांना कोणी लग्नासाठी मुलगी द्यायला तयार होत नसे. अशी परिस्थिती असतानाही मला या वाटेवर आणणारं महत्त्वाचं वळण मिळालं ते बेंगळुरूमध्ये, माझ्या आजोळी. प्रत्येक सुट्टीत आम्ही कर्नाटकला, मामाच्या गावी जायचो. आई-वडिलांना बघत असल्यानं या क्षेत्राबाबत सुप्त आकर्षण होतंच, पण हॉटेल व्यवसायाची ‘मुळाक्षरं’ मी खऱ्या अर्थानं गिरवली ती आजोळीच.
मामाकडं गेल्यावर माझी अन्य भावंडं चित्रपट पाहायला, खेळायला जायची. पण माझी पावलं आमच्या आजोबांच्या, म्हणजे आईच्या काकांच्या बेंगळुरूमधील हॉटेलकडे वळायची. तिथं जाऊन मी सगळं पाहत असे. यातून आजोबांच्या हॉटेलमधल्या सुब्बाराय भट्ट या आचाऱ्याशी माझी चांगली गट्टी जमली. त्यांनी मला स्वयंपाककलेची अनेक ‘गुपितं’ शिकवली. सोबत कन्नड भाषाही.
आजोबांची दोन हॉटेल होती. सुरुवातीला गल्ला, आत अगदी टेबल टेनिस खेळता येईल एवढी भली मोठी टेबलं, अशी इराणी हॉटेलांसारखी त्यांची रचना होती. मी एकदा आजोबांना म्हणालो, ‘मी तुम्हाला मुंबईतल्या हॉटेलसारखी रचना करून देऊ का?’ मी तेव्हा अवघा १६-१७ वर्षांचा होतो. विशेष म्हणजे, तरीही आजोबांनी विश्वास दाखवला व मला संधी आणि एक महिन्याचा कालावधी दिला. मग मी सकाळी लवकर जाऊन एका सुतार वजा आर्किटेक्टसोबत काम सुरू करायचो. मी कधी मोजपट्टी वापरली नाही. एक दोरा हीच माझी मोजपट्टी. महिनाभरात त्या हॉटेलचा अक्षरश: कायापालट केला. सगळ्यात पहिलं म्हणजे मी टेबलांचा आकार कमी केला. त्यामुळे आणखी टेबलं वाढवता आली. केवळ एवढं करून मी थांबलो नाही, तर व्यवस्थापनातही अनेक बदल केले. त्या हॉटेलात अनावश्यक, अतिरिक्त कर्मचारी खूप होते. म्हणजे पाणी काढायला एक, पाणी द्यायला, प्लेट उचलायला दुसरा अशाप्रकारे. मी त्यात सुसूत्रता आणली.
पाणी काढणाऱ्या व्यक्तीलाच पाणी देण्याचं काम सोपवलं. येताना प्लेटही त्यानं उचलाव्यात, अशी सूचना केली. यातून ६०चं मनुष्यबळ मी ४५वर आणलं. दिवसभरात जो उत्तम काम करत असे, त्याला एखादा गोड पदार्थ ‘बक्षिसी’ म्हणून देण्याची पद्धत मी रूढ केली. उरलेल्या माणसांना अन्यत्र काम देण्याची विनंती केली. अशा प्रकारे प्रत्येकी अगदी हजार रुपये पगार असला तरी मी १५ हजार रुपये वाचवले. शिवाय १५ लोकांचं जेवण, गणवेश आणि राहण्याच्या जागेच्या खर्चात बचत झाली. माझं हे ‘व्हॅल्यू इंजिनीअरिंग’ आजोबांना प्रचंड भावलं. त्यांनी खूप कौतुक केलं. त्यांनी माझ्या वडिलांना याबाबत सांगितलं; परंतु ते अजूनही मी या क्षेत्रात येण्याबाबत अनुकूल नव्हते. त्यामुळे मी इंजिनीअरिंगकडं वळलो.
दुसरीकडं, आजोबांच्या हॉटेलमध्ये मी आणलेल्या सुसूत्रतेमुळे त्यांना आर्थिक फायदा होऊ लागला. त्यामुळे पुढच्या सुट्टीत आणखी एका चुलत आजोबांनी मला खास त्यांच्या हॉटेलचं रूपडं पालटण्यासाठी आमंत्रित केलं. तिथंही मी ‘रॉबर्ट मनी’ या टेक्निकल शाळेत जे शिकलो होतो व मुंबईत जे पाहिलं होतं, त्यानुसार आकलनाप्रमाणे बदल केले. विशेष म्हणजे, त्यांनाही ते प्रचंड भावलं. पुन्हा माझ्या तथाकथित कामगिरीचा पाढा वडिलांपुढे वाचला गेला. यावेळी वडिलांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या मनात काहीतरी सुरू झालं असावं कदाचित. अर्थात, हॉटेल व्यवसायातील माझ्या पदार्पणाची पायाभरणीच तेव्हा झाली असावी, असं मला आवर्जून वाटतं.
दरम्यान, सुरुवातीला गिरगावात इडलीचं छोटंसं दुकान व नंतर इंडियन मर्चंट चेंबरमधलं ‘कॅफे भारत’ चालवल्यानंतर वडिलांनी १९५२ मध्ये अगदी मंगळसूत्रासह आईचे सर्व दागिने गहाण ठेवून चर्चगेट रेल्वे स्थानकानजीक ‘सत्कार’ नावाचं हॉटेल सुरू केलं. माझ्या आजोळून झालेल्या प्रशंसेचं फलित म्हणजे मला वडिलांनी या हॉटेलमध्ये यायला परवानगी दिली. पण मी तिथं केवळ ‘वेटिंग’मध्ये असलेल्याची नावं लिहायला वगैरे उभा राहायचो. चर्चगेट परिसरात अनेक मैदानं आहेत. त्यामुळे हॉकी, क्रिकेट, फुटबॉलचे सामने किंवा ‘एअर शो’ असले की ‘सत्कार’मध्ये गर्दी व्हायची. मी ती शिताफीनं हाताळायला लागलो. वडील माझ्यावर बारीक लक्ष ठेवून असायचे. माझी कामाची पद्धत पाहून एव्हाना त्यांना माझ्याबद्दल थोडाफार विश्वास वाटू लागला होता. त्यासोबत ‘सत्कार’मधील माझ्या कामाची कक्षा रुंदावत गेली. मी किचनमध्ये उभा राहू लागलो. तिथं मला काही गोष्टी खटकत होत्या व माझ्या शिक्षणाचा बाज ‘टेक्निकल’ असल्यानं त्यांकडे मी त्यादृष्टीने पाहत होतो.
कुठं मनुष्यबळ, पाणी, तर कुठं साहित्य वाया जात असल्याचं मला दिसत होतं. इथं एक गोष्ट माझ्या दृष्टीस पडली ती म्हणजे, एका ताटात दोन इडल्या, ओल्या चटणीची वाटी, सुक्या चटणीला एक वाटी आणि एक सांभार वाटी अशा तीन वाट्या दिल्या जात होत्या. हे सर्व साहित्य ठेवायला मोठी जागा लागत असे. दुसरं म्हणजे, संबंधित कर्मचारी बाहेरून वाट्यांनी भरलेलं ताट आणून थडाडा त्यातील सगळ्या वाट्या बेसीनमध्ये टाकायचा. यातून एकतर मोठा आवाज व्हायचा आणि वाट्या-प्लेटचं नुकसानाही होत असे. ही बाब सातत्यानं मला अस्वस्थ करत होती. त्यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा, असं मी ठरवलं. त्यानुसार विचार करून मी प्लेटमध्येच दोन कप्पे असलेली प्लेट तयार केली. आज सर्वत्र दिसणाऱ्या या प्लेटची निर्मिती माझी आहे, हे अनेकांना माहीत नसेल. हॉटेल व्यवसायात ती ‘कामत प्लेट’ म्हणून तेव्हा प्रसिद्ध झाली. यातून तीन फायदे झाले. एक तर वाट्यांचा खडखडाट कमी झाला, त्या धुण्यासाठी लागणारं पाणी व मनुष्यबळाची बचत झाली आणि वाट्या ठेवण्यासाठी लागणारी जागा रिकामी होऊन तिथं काही टेबलं लावता आली.
माझ्या आयुष्यात वडिलांची पहिली शाबासकी मला याच प्लेटनं मिळवून दिली. माझ्यासाठी तो एकप्रकारे ‘सत्कार’च होता. त्यानंतर मी त्यांचं मन जिंकलं ते वॉश बेसीनमध्ये केलेल्या नावीन्यपूर्ण बदलामुळे. तोपर्यंत भांडी धुण्यासाठी खूप पाणी वाया जात होतं. मी बेसीनमध्ये चार कप्पे तयार केले. पहिल्यामध्ये प्लेट नुसती विसळली जायची. दुसऱ्यामध्ये साबणाचं पाणी. त्यात ती धुवून पुढच्या थंड पाण्याच्या कप्प्यात विसळली जायची आणि अखेरीस, शेवटच्या गरम पाण्याच्या कप्प्यात ती अगदी स्वच्छ धुवून काढली जायची. महत्त्वाचं म्हणजे हे काम करणाऱ्या माणसांना मी ग्लोव्हज् पुरवली. जेव्हा तुम्ही श्रमिकांच्या श्रमांना प्रतिष्ठा देता, तेव्हा त्यांनाही काम करताना अभिमान वाटतो, इतकं तर मी तोपर्यंत निश्चितच शिकलो होतो. यातून या कामासाठी माणसं मिळू लागली. माझी की संकल्पना वडिलांना प्रचंड भावली व हॉटेल व्यवसाय आणि पर्यायानं आयुष्यात मी काही तरी करू शकतो, असा त्यांचा विश्वास दृढ झाला. त्यानंतर मी ‘सत्कार’मध्ये खऱ्या अर्थानं सक्रिय झालो. माझ्या आकलनानुसार तिथं अनेक बदल करत गेलो, वडिलांचा विश्वास आणि मन जिंकत गेलो.
सन १९६६ ते १९७२पर्यंत मी या हॉटेलमध्ये पडेल ते काम केलं. त्यातून आलेल्या अनुभवामुळे हॉटेल व्यवसायात पाऊल ठवण्याचं धाडस मनात डोकावू लागलं. त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, तेव्हा हे क्षेत्र असंघटित होतं. मुळात अशा वेळीच जास्त संधी असते, हा विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. त्यामुळं या व्यवसायातच करिअर करायला हवं, हे मनानं पक्क केलं आणि हॉटेल‘सम्राट’ होण्याच्या ध्येयाची वाट मला दिसू लागली.
…
(शब्दांकन : लहू सरफरे)

