Videocon Bankruptcy: एकेकाळी टीव्ही, फ्रिज आणि AC सारख्या उत्पादनांनी प्रत्येक घरावर राज्य करणारी व्हिडिओकॉन कंपनी आता इतिहासजमा झाली आहे. व्हिडिओकॉनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दिवाळखोरीचे प्रकरण, 90000 कोटी रुपये, चालवले जात आहे.

धूतनी मोठी स्वप्ने पहिली अन् सत्यात उतरवली
एका छोट्याशा गावातून आलेल्या वेणुगोपाल धूत यांनीमोठी स्वप्ने पाहिली आणि प्रत्यक्षात उतरवली. महाराष्ट्रातील अहमदनगर येथे धूत यांचे वडील नंदलाल माधवलाल धूत यांनी 1984 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपचा पाया घातला. याआधी त्यांचे कुटुंब बजाज ऑटो स्कूटरची डीलरशिप चालवायचे आणि कापसाचा व्यापार करायचे. वेणुगोपाल यांनी 1986 मध्ये व्हिडिओकॉन इंटरनॅशनलची स्थापना केली.
लोभापोटी सगळं उद्धवस्त झालं
1980 च्या दशकापासून 2000 च्या दशकापर्यंत व्हिडिओकॉन ग्रुप देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी मानला जायचा. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल अंदाजे 5 अब्ज डॉलर्स किंवा आजच्या हिशोबाने सुमारे 482 हजार कोटी रुपये होते. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कंपनीचा दबदबा असायचा पण, प्रमोटर वेणुगोपाल धूत यांनी आपल्या लोभापोटी सगळं उद्धवस्त केलं आणि कंपनीवर हजारो कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा पडला. परिस्थिती इतकी बिकट झाली की कंपनीकडे व्याज भरायलाही पैसा नव्हता आणि अखेरीस 90000 कोटींच्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. यामुळे ग्रुपच्या 33 कंपन्यांमधील धूत यांची मालकी अक्षरशः संपुष्टात आली.
भारतात रंगीत टीव्ही सादर करणारी पहिली कंपनी
वेणुगोपाल धूत सामील झाल्यानंतर व्हिडिओकॉनने झपाट्याने प्रगती करण्यास सुरुवात केली आणि भारतात रंगीत टीव्ही सादर करणाऱ्या पहिल्या कंपन्यांपैकी बनली. एकेकाळी व्हिडिओकॉन रंगीत टीव्हीचे समानार्थी बनलेले. देशभरातील मागणी लक्षात घेऊन व्हिडिओकॉनने अनेक उत्पादन युनिट्स उभारलीच पण चीन, मेक्सिको, पोलंड आणि इटलीमध्येही कारखाने सुरू केले. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर व्हिडिओकॉनने दूरसंचार, तेल आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये प्रवेश केला.
शाहरुख खान बनला व्हिडिओकॉनचा ब्रँड ॲम्बेसेडर
जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर वेणुगोपाल यांनी भारतात टेलिव्हिजन बनवण्याचे स्वप्न पाहिले आणि सर्वप्रथम शाहरुख खानला कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवले. दूरदर्शनने रंगीत प्रसारण सुरू केल्यावर धूत यांनी व्हिडिओकॉन इंटरनॅशनलची स्थापना केली आणि सुरुवातीला केवळ कंपनीचे लक्ष्य दरवर्षी 100000 टीव्ही सेट तयार करण्याचे लक्ष्य ठेवले. 1990 च्या दशकात धूत यांच्या कंपनीने जपानी कंपनी तोशिबासोबत करार करून रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि होम एंटरटेनमेंट सिस्टीमचे उत्पादन सुरू केले.
व्हिडिओकॉनची चमक फिकी पडली
1990 दशकाच्या उत्तरार्धात सॅमसंग आणि LG यासारखे परकीय ब्रँड भारतात आले, ज्यांनी आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर व्हिडिओकॉनला मागे टाकले. कंपनीच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आणि हळूहळू महसूल घटला. कंपनीवरील कर्जाचे ओझे 31000 कोटींपर्यंत वाढले.
व्हिडिओकॉन इतिहासजमा कसा झाला
कधीकाळी व्हिडिओकॉन ग्रुप टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांसारख्या उत्पादनांचा सर्वात विश्वासार्ह निर्माता मानला जायचा. देश-विदेशात व्यवसाय भरभराटीला येताना आणखी विस्तार करण्याच्या उद्देशाने धूत बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊ लागले. आफ्रिकेतील मोझांबिक देशात तेल ब्लॉक खरेदी करण्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली, पण प्रकल्प अयशस्वी ठरला. याशिवाय दूरसंचार क्षेत्रात जिओसारख्या कंपन्यांशी स्पर्धा न करू शकल्यामुळेही ग्रुपला आणखी नुकसान सहन करावा लागला. व्हिडिओकॉन ग्रुपने SBI आणि ICICI बँक यासारख्या बँकांकडून अंदाजे 40000 कोटींचे कर्ज घेतलेले तर, यापैकी एसबीआयच्या कर्जासाठी धूत यांनी 8000 कोटी रुपयांची वैयक्तिक हमी दिलेली.
चंदा कोचर प्रकरणाने अडचणीत भर
ICICI बँकेकडून प्रचंड कर्जासाठी धूतने बँकेच्या तत्कालीन अध्यक्षा चंदा कोचरच्या संगनमताने फसवणूक केल्याचे उघड झाले. यानंतर एकीकडे चंदा कोचरची कारकीर्द संपुष्टात आली आणि व्हिडिओकॉनला मोठे नुकसान झाले. हजारो कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला गेला, ज्यामध्ये धूतला प्रमुख आरोपी म्हटले गेले. 2018 मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा कर्ज देणाऱ्या बँकांना 90% हून अधिक नुकसान झालेले.
वेणुगोपाल धूतवर नेमके आरोप काय
सीबीआयच्या माहितीनुसार व्हिडिओकॉन ग्रुपने ICICI बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी शेल कंपन्यांमार्फत 64 कोटी रुपये चंदा कोचर आणि कुटुंबाकडे वळवले. चंदा कोचरचे पती दीपक कोचरच्या मालकीच्या ‘न्यूपॉवर रिन्युएबल्स’ या कंपनीत ही रक्कम गुंतवली गेली. तसेच व्हिडिओकॉनला 3,250 कोटींचे मोठे कर्ज मिळाल्यानंतर काही दिवसांतच ही गुंतवणूक झाल्याचे सीबीआयच्या अहवालातून समोर आली. ICICI बँकेने व्हिडिओकॉन ग्रुपला दिलेली बहुतेक कर्जे आता NPA केली गेली आहेत.
व्हिडिओकॉनचा नवा मालक कोण?
2018 पासून व्हिडिओकॉनची दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू असून सर्वोच्च न्यायालयाने व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी हिरवा कंदील दाखवला. वेणुगोपाल धूत यांनी व्हिडिओकॉन समूहाच्या दोन कंपन्या – व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड आणि व्हिडिओकॉन ऑइल व्हेंचर्स लिमिटेड – साठी स्वतंत्र दिवाळखोरी प्रक्रियेला मान्यता देणाऱ्या NCLAT च्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले, पण धूत यांनी दोन्ही कंपन्यांसाठी संयुक्त दिवाळखोरी प्रक्रियेची मागणी केली होती. व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज आणि समूह कंपन्यांवर एकूण सुमारे 90000 कोटींचे कर्ज आहे.

