Narayan Kulakrni Kavthekar:विदर्भ साहित्यात संघात पूर्वी सारखं वातावरण नाही.नाट्यप्रयोग ,संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शक पूर्वी सातत्याने होत असत.परंतू आता तसे दिसत नाही.
अशी खंत ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी पुस्तक प्रकाशन समारंभात व्यक्त केली.

ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात सोमवारी हा कार्यक्रम विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि राम गणेश गडकरी प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी राम गणेश गडकरी प्रतिष्ठानचे डॉ. अविनाश रोडे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. शरद पाटील, लेखक प्रवीण बर्दापूरकर, वर्णमुद्रा प्रकाशनचे मनोज पाठक, गडकरी प्रतिष्ठानचे हेमंत काळीकर, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे बाळ कुळकर्णी, नीलेश खांडेकर उपस्थित होते.
इमारतीत तसे वातावरण दिसत नाही
विदर्भ साहित्य संघात पूर्वी अनेक तरुण अभ्यासासाठी येत असत. त्यांच्यासाठी तेथे संदर्भ ग्रंथ आणि मार्गदर्शन दोन्ही उपलब्ध होते. नाटक वगैरे कलाप्रकारांमध्ये काम करणारी मंडळी तेथे दिसत. अनेक चांगले नाट्यप्रयोग होत असत. आता, त्या इमारतीत असे वातावरणच दिसत नाही. साहित्याच्या सत्त्वासाठी आता तेथे जागा उरलेली नाही. काही करू बघणाऱ्या तरुण मुलांनी आता कुठे जायचे,असाही सवाल कुळकर्णी यांनी उपस्थित केला.
प्रवीण बर्दापूरकर ,अविनाश रोडे मनोज पाठक यांनी केलं मनोगत व्यक्त
‘बर्दापूरकर यांनी स्वाभिमानाशी कधीही तडजोड केली नाही आणि पत्रकारितेतील मूल्यांशी तडजोड केली नाही. त्यांनी अनेकांना लिहिते केले तसेच अनेकांच्या अडचणीत मदतही केली,’ असे शरद पाटील म्हणाले.
प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक आणि पत्रकारितेतील त्यांच्या लेखनाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणातून डॉ. अविनाश रोडे यांनी प्रवीण बर्दापूरकर यांचे संपादक आणि लेखक म्हणून आलेले विविध अनुभव सांगितले. मनोज पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. बाळ कुळकर्णी यांनी आभार मानले.

