Billionaire Downfall: भारतात स्टारबक्सचे अस्तित्वही नव्हते त्या काळात 1996 मध्ये व्ही.जी. सिद्धार्थ यांनी CCD म्हणजे कधीकाळी तरुणाईची पहिली पसंत राहिलेल्या ‘कॅफे कॉफी डे’ची सुरुवात केली. सिद्धार्थनी देशाला कॉफीची ओळख करून दिली, हजारो रोजगार निर्माण केले आणि अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला, मात्र त्यांचा अंत दुःखद झाला.

व्ही.जी. सिद्धार्थ कोण होते?
कर्नाटकातील चिकमंगळूर, जे स्वादिष्ट कॉफीसाठी ओळखले जाते, येथे सिद्धार्थ यांचा जन्म झाला. सिद्धार्थचे कुटुंब 140 वर्षांपासून कॉफीच्या मळ्यांच्या व्यवसायात करायचे आणि येथूनच सिद्धार्थला आपला व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली. सिद्धार्थ यांना आजही भारतातील सर्वात मोठे कॉफी साम्राज्य उभारण्याचे श्रेय दिले जाते.
CCD ची सुरुवात कशी झाली
जुलै 1996 मध्ये बेंगळुरूमधील ‘कॅफे कॉफी डे’ने ब्रिगेड रोडवर सर्वप्रथम कामकाजाला सुरुवात केली. पहिले इंटरनेट कॅफे म्हणून सीसीडीची सुरुवात झाली आणि त्यावेळी देशात इंटरनेटचा नुकताच प्रसार सुरू झाला होता, ज्याचा सिद्धार्थनी फायदा घेतला. इंटरनेटसोबत कॉफीचा आनंद घेणे नव्या पिढीसाठी अनोखा अनुभव होता. अशाप्रकारे हळूहळू व्यावसायिक इंटरनेटचा प्रसार होऊ लागल्यावर सीसीडी कॉफीच्या मूळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करू लागले आणि देशभरात CCD सुरू झाले. कॅफे उघडल्यानंतर पहिल्या पाच वर्षांत CCD देशातील सर्वात मोठी कॉफी रिटेल चेन बनली आणि मग हळूहळू देशभरातील 247 शहरांमध्ये हजारोंच्या संख्येत CCD उभे झाले.
CCD सुरू करायची कल्पना कशी सुचली
सिद्धार्थच्या कुटुंबाला कॉफी लागवडीची 150 वर्षांची परंपरा आहे. त्यांच्या कुटुंबाकडे मालकीचे कॉफीचे मळे होते, जिथे उच्च प्रतीची कॉफी पिकवली जायची जे त्यांच्या व्यवसायाचे मुख्य घटक होते. 1990 च्या दशकात दक्षिण भारतात कॉफीचे प्रामुख्याने सेवन केले जायचे आणि केवळ पंचतारांकित हॉटेल्सपुरतीच मर्यादित होती. पण सिद्धार्थनी सर्वसामान्यांपर्यंत कॉफीचा आस्वाद पोहोचवण्याचा निर्धार केला. सिद्धार्थचे स्वप्न आणि कुटुंबाचे कॉफी व्यवसायातील सखोल ज्ञान, या दोन्हींच्या सामंजस्यातून CCD ची कल्पना सत्यात उतरली.
वडिलांच्या पाच लाखांतून उभारला व्यवसाय
पण सिद्धार्थसाठी व्यवसाय करणं सोपं नव्हतं. बाबांकडून 5 लाख रुपये घेऊन सिद्धार्थनी कॉफीचा व्यवसाय सुरू केला. पण पैसे देण्यासोबतच बाबांनी सिद्धार्थला सांगितलेलं की अयशस्वी झाला, तर वडिलोपार्जित व्यवसाय हाती घ्यावा लागेल. पण सिद्धार्थने आपलं स्वप्न पूर्ण केलं आणि कॉफीचा व्यवसाय भरभराटीला आला.
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई
सिद्धार्थ यांचा विवाह कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या मुलीशी झालेला. त्यांनी मंगळूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली असून 1983 मध्ये वयाच्या 24व्या वर्षी मुंबईतील जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये इंटर्न म्हणून काम केले. मग, जेएम फायनान्शियलमध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर सिद्धार्थ बेंगळुरूला परतले.
अब्जावधींचा व्यवसाय अन् रोजगाराच्या संधी
CCD मुळे सिद्धार्थ केवळ अब्जाधीशच बनले नाही तर, हजारो तरुणांना रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या. कंपनीच्या (कॉफी डे एंटरप्रायझेस) स्वतःच्या कॉफीच्या मळ्या होत्या, तर 2015 मध्ये कंपनीने आयपीओ आणला, ज्याचे मूल्यांकन अब्जावधी रुपयांपर्यंत पोहोचले. सिद्धार्थला भारतातील कॉफी संस्कृतीचा प्रणेता मानले जाऊ लागले.
2017 मध्ये आयकर विभागाचा छापा
सगळं काही सुरळीत सुरू होतं की 2017 मध्ये सिद्धार्थ कर चुकवेगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आले. याच काळात कर्नाटक आणि गोवा येथील आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि चिकमंगळूर येथील 20 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. आयकर विभागाने CCD या रिटेल चेनवरही छापा टाकून 650 कोटी रुपयांची कमाई जप्त केली. (प्रातिनिधिक फोटो)
एकाच दिवसात 813 कोटींचा तोटा
सिद्धार्थ अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आल्यावर कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेड (CCD) च्या शेअर्समध्ये 20% घसरण झाली, परिणामी कंपनीचे बाजार भांडवल एका दिवसात 813 कोटींनी कमी झाले. 31 मार्च 2029 पर्यंत कॉफी डे एंटरप्रायझेसवर 6,547 कोटींचे कर्ज होते (जे कंपनीच्या 2,529 कोटींच्या नेट मालमत्तेच्या अंदाजे अडीच पट होते). पण सिद्धार्थने माइंडट्रीमधील हिस्सा विकल्यानंतर कर्ज लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे वृत्त समोर आले.
दुःखद शेवट अन् कॉफीचा वारसा
कंपनीवरील कर्जाचा बोजा आणि इतर आव्हानांचे कारण देत सिद्धार्थनी 2019 मध्ये मृत्यूला कवटाळलं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीमालविका हेगडेनी सूत्रे हाती घेतली आणि कंपनीला पुन्हा उभारी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण तोपर्यंत कॉफीच्या क्षेत्रातही स्पर्धा खुप वाढलेली तरीही CCD अजूनही बाजारात आपले मजबूत स्थान टिकवून आहे.

