Headlines

Trupti Akkalwar : ‘कुणालाही पैसे काढायला द्यायचे नाहीत’, सिद्धूचा बँकेत फोन अन् बदललं अभिनेत्याच्या पत्नीचं आयुष्य; म्हणाली, ‘मी डिस्टर्ब झाले’


Trupti Akkalwar : करोना काळात सिद्धार्थ जाधवने बँकमध्ये फोन करून कुणालाही पैसे काढायला द्यायचे नाहीत, असं सांगितलं. त्यावेळी अभिनेत्याची पत्नी त्याचं फायनान्स बघत होती. सिद्धार्थच्या या बोलण्यानं तृप्तीला धक्का बसला. त्यानंतर तिनं स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

Trupti Akkalwar On Siddharth Jadhav
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेता असून त्यानं बॉलिवूडमध्येही स्वतःचं स्थान मिळवलं आहे. सिद्धार्थ अभिनेता आहेच पण त्याचबरोबर त्याची पत्नी तृप्ती अक्कलवार सुद्धा यशस्वी उद्योजिका असून तिचे एक नाहीत तर तीन व्यवसाय आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तृप्तीनं व्यवसाय सुरू करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचं कारण सांगितलं आहे.

सिद्धूचा एक फोन कॉल अन् बदललं तृप्तीचं आयुष्य

‘लोकमत सखी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तृप्ती म्हणाली की, ‘२०२० मध्ये करोना काळात सगळेच घरी होते. करोनामुळे माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप मोठा फरक घडला. तेव्हा मी आणि सिद्धू २४ तास घरात होतो. तेव्हा माझी आणि सिद्धूची खूप छोटी मोठी भांडणं होत होती. पण आता मी मागे वळून बघते तेव्हा मला त्यावर खूप हसायला येतं. पण तो काळ खूप कठीण होता. एक दिवस मी किचनमध्ये ब्रेकफास्ट बनवत होते. सिद्धू बाहेर फोन करत होता. तो मला दिसत नव्हता. त्याच्या एक दिवस आधी आमचं भांडणं झालं होतं. त्याने बँकेत फोन लावला. आमचं जॉइंट अकाऊंट होतं. तिथे त्याने फोन लावला आणि तो म्हणाला, ‘हॅलो नमस्कार मी सिद्धार्थ जाधव बोलतोय. आजच्यानंतर माझ्या बँक अकाऊंटमधून मी चेक केल्याशिवाय तुम्ही तो चेक पास करायचा नाही, पैसे काढायला द्यायचे नाही.’ हे मी किचनमध्ये ऐकत होते. हे ऐकून मी हलले.’

तृप्ती पुढे म्हणाली, ‘२०२० पर्यंत सिद्धूचं सगळं फायनान्स मी सांभाळत होते. असं काही नव्हतं की, त्याला माहिती नव्हतं. घर त्याच्या नावावर होतं, आमच्या दोन गाड्या त्याच्या नावावर होत्या. त्यामुळे वैयक्तिक असं काही नव्हतं. फक्त माझं एक होतं की, मी आई-वडिलांच्या विरोधात जाऊन ज्या मुलाशी लग्न केलं आहे, त्या माणसाला मला सक्सेसफुल बनवायचं आहे. सक्सेस त्याचंच आहे पण आपलीपण जिद्द असते. त्यामुळे मी २०१३ ला स्वखुशीनं नोकरी सोडली होती. कारण तोपर्यंत सिद्धू सेटल झाला होता. दोन मुली होत्या. सिद्धूच्या पैशांवर आपण आपला संसार चालवू शकतो हा कॉन्फिडन्स मला आला होता.’

siddharth Jadhav birthday special : बॉलिवूडमध्येही चमकणाऱ्या मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचा यशस्वी प्रवास

‘तो फोन कॉल झाला तेव्हा मी डिस्टर्ब झाले. आपल्याला कोणीतरी बिनपगाराच्या नोकरीवर काढून टाकलं आहे असं मला वाटलं. त्यानंतर त्याने आणखी एक-दोन फोन कॉल केले. त्यानंतर तो म्हणाला की, आजच्यानंतर मी माझ्या डेट्स वगैरे सांभाळेन. त्यानंतर मी पण त्याला म्हणाले, ‘आजच्यानंतर मी तुझं काही सांभाळणार नाही. तू तुझं-तुझं बघून घे.’
Maharashtra TimesSachin Goswami : विकृतीचा कळस! आक्षेपार्ह थंबनेल देऊन हास्यजत्रेचे एपिसोड पोस्ट; सचिन गोस्वामी प्रचंड संतापले
तृप्ती म्हणाली, ‘त्यानंतर मी पुष्कळ रडले. कारण तोपर्यंत माझ्यासाठी संसार महत्त्वाचा होता. मी खूप इमोशनल झाले होते. आपल्या आयुष्यात अशी फेज येईल असं मला वाटलं नव्हतं. आज त्या गोष्टीला मी खूप पॉझिटिव्ह घेते. मी खूप विचार करत होते की, मी आयुष्यात काय करू? मी जॉबसाठी मित्र मैत्रिणी, बॉसेसना फोन केले की मला जॉब करायचा आहे. पण मला कोणी जॉब दिला नाही. ही सिद्धार्थची जाधवची बायको आहे, हिला काय गरज आहे जॉबची असंही त्यांना वाटलं असेल.’
Maharashtra TimesYatin Karyekar : मराठी अभिनेत्रीसोबत लग्न अन् घटस्फोट, डिप्रेशनमध्ये गेलेले यतीन कार्येकर, दारूचं व्यसनही लागलेलं; सांगितली आपबिती
‘माझ्या आयुष्यात सिद्धूचं विश्व होतं. माझ्या आयुष्यात खूप मित्र-मैत्रिणी नव्हत्या. मी फॅमिली लाइफ एन्जॉय करत होते. त्याला माझी गरज आहे तर मी जाणार. त्याने जबरदस्ती केली नाही. पण त्याला वाटतंय ना तर मी आहे. मी त्याला सपोर्ट केलं. पण २०२० नंतर मी ठरवलं की, आपण काय आहोत, आपलं काय महत्त्वं आहे, हे सिद्ध करणं गरजेचं आहे. हा स्ट्रगल माझा माझ्यासाठी होता, कोणाला दाखवण्यासाठी नव्हता. मी आयुष्यभर अशीच डॅशिंग होते. पण मी स्वत:ला संसारात रमवून घेतलं होतं. मला कोणीही सांगितलं नव्हतं. याच्यापुढे असं काही तरी करू की, स्वत:ला आरशात पाहताना असं नको वाटायला की, आपला जन्म का झाला आहे आणि आणि आपण काय करतोय. तोपर्यंत सिद्धू बऱ्यापैकी सेट झाला होता. मग मी २०२० मध्ये माझा प्रवास सुरू केला.’ असं तृप्तीनं शेवटी सांगितलं.

दरम्यान, तृप्तीचं दादरमध्ये सलून असून तिची एक कंपनीसुद्धा आहे. त्याचबरोबर तृप्तीनं अलिबागमध्ये होम-स्टे कॉटेज सुरू केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा