ST Bus Employee Salary Hike: बसगाड्यांची संख्या २४ हजारांपर्यंत नेण्याची उद्दिष्टपूर्ती झालेली नाही. एसटीच्या आगारांबाहेरच खासगी बेकायदा वाहतूकदार प्रवाशांना ‘टिपतात’! आगारांची स्थिती अत्यंत भयानक आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन, ग्रॅच्युईटी, भत्ते व एकूणच थकीत देणी यांचे प्रमाण पाच हजार कोटींवर पोहोचले होते. अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्य सरकारने या ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के, घरभाडे भत्त्यात दोन ते सहा टक्के आणि वार्षिक वेतनवाढीत तीन टक्के वाढ मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. एसटीच्या तिजोरीवर त्याचा भार पडणे स्वाभाविकच. त्यासाठीच एसटीचे व्यवस्थापन अधिक व्यावसायिक कसोटीवर चालविण्याची नितांत गरज आहे. बसआगारांचा व्यावसायिक वापर करण्याची सर्वंकष योजना महामंडळाने आखली, त्यातील तांत्रिक त्रुटी अजून दूर झालेल्या नाहीत. एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्या १६ हजार असली, तरी सर्व बसगाड्या रस्त्यावर धावण्याच्या स्थितीतील नाहीत.
विजेवर चालणाऱ्या बस ताफ्यात दाखल होऊनही त्या वेळेत आगारातून सुटत नाहीत. जुन्या बसगाड्या रस्त्यावर कधी मान टाकतील, हे सांगता येत नाही. कित्येक गाड्या कमालीच्या अस्वच्छ असतात. आगारांमध्ये तंत्रकुशल कर्मचाऱ्यांची संख्या रोडावली असल्याने बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर त्याचा परिणाम होतो.
एसटीच्या कार्यशाळांमध्ये बांधल्या जाणाऱ्या बसगाड्या ही पूर्वी खासियत होती. खरेतर या कार्यशाळांचा अर्धव्यावसायिक वापर करून महसूलप्राप्तीचा नवा पर्याय उभा राहू शकतो. राज्य शासनाकडून मध्यंतरी निधीसाठी हात आखडता घेण्यात आला होता. एसटीकडे केवळ कमाईचे साधन म्हणून खचितच पाहता येणार नाही; परंतु ही सेवा व्यावसायिकरीत्या चालविली नाही, तर प्रवासीही टिकून राहणार नाहीत. मनुष्यबळाला सक्षम करतानाच आर्थिक शिस्तीची कसोटीही हवी.

