Wardha SSC old student Result : वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षांच्या अजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या या आज्जीचे सर्वत्र कौतुक होत असून आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

केवळ सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेल्या इंदूताई परमेश्वर बोरकर यांना त्यावेळच्या परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही. पण वयाच्या ६८ व्या वर्षी इंदूताईंना प्रथम संस्थेकडून सेकंड चान्स मिळाला आणि त्यांनी दहावीची परीक्षा देत यश संपादन केले आहे. यावरुन दृढ इच्छाशक्ती असेल तर माणसासाठी वय हा केवळ आकडा असतो. ते वयाला न जुमानता जिद्दीने पुढे जातात.
SSC Student 2025 : दृष्टी नसतानाही जिद्दीला हरवता आलं नाही, ब्लाइंड स्वीमर ईश्वरी पांडेचे लख्ख यश; शाळेत मिळवले दुसरे स्थान
जामनी या गावात इंदूताई ह्या बचत गटाच्या कामात सतत पुढाकार घेतात. इंदूताईनी माहेरी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळी लग्न झालं. शिकण्याची इच्छा असतानाही पुढे शिकता आले नाही. परंतु प्रथम या संस्थेने शिकण्याची इच्छा असणाऱ्या महिलांना सेकंड चान्स देत दहावीची परीक्षा तयारी करून घेतली, त्यांना परीक्षेला बसविले. त्यात इंदूताई यांनी देखील वर्षभर दहावीचे धडे गिरवत परीक्षा दिली. इंदूताईसोबत परीक्षा द्यायला केंद्रावर नातू देखील होता. आजी आणि नातवाची दहावीची परीक्षा एकाच वेळी झाल्याने हे दोघेही चर्चेचा विषय ठरले आहेत. म्हातारीला या वयात परीक्षा सुचली, म्हणत टीकाही व्हायला लागली. पण आता याच म्हातारीने परीक्षेत यश मिळवून सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

